महिला स्वच्छतागृहांची वानवा
By Admin | Updated: January 7, 2015 22:52 IST2015-01-07T22:52:08+5:302015-01-07T22:52:08+5:30
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बारामती शहरात महिलांसाठी मात्र केवळ ५ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत.

महिला स्वच्छतागृहांची वानवा
प्रज्ञा कांबळे - बारामती
शहरातील वाढती लोकसंख्या, तसेच महिलांचा सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील वाढता वावर आणि त्यासाठी करावा लागणारा प्रवास लक्षात घेता शहरामध्ये महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह वापरायोग्य नसल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाली आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बारामती शहरात महिलांसाठी मात्र केवळ ५ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत.
राज्य शासनाच्या २०१४ च्या महिला धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणे, शासकीय-निमशासकिय कार्यालये, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह उपलब्ध करावीत. तेथे पाण्याची व्यवस्था करावी, असे आदेश दिले आहेत. तशी व्यवस्था नसल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. बारामती शहरातील सद्य:स्थिती लक्षात घेता तहसील कचेरी, रेल्वे स्टेशन, नगरपालिका, गणेश भाजी मंडई, अशा प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. तसेच, या ठिकाणी पाण्याची पुरेशी सुविधाही नाही. घाणीच्या विळख्यात अडकलेल्या या स्वच्छतागृहांचा महिलांकडून वापरही होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांची कुचंबणा होते.
बारामती बसस्थानकांत असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था अतिशय बिकट आहे. बारामती शहरात तालुक्यासह आसपासच्या परिसरातील ४० ते ४५ किमी अंतरावरून विद्यार्थिनी, महिला, शिक्षण, तसेच व्यवसायानिमित्त ये-जा करीत असतात. या दरम्यान जर या महिलांना स्वच्छतागृहाचा वापर करायचा असेल, तर त्या टाळतात. याचा त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असतो.
मात्र, याचा वापर त्यांच्या दुरवस्थेमुळे या महिलांकडून टाळला जातो. पाण्याची गैरसोय, स्वच्छतेचा अभाव यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर या महिला करीतच नाही. या सार्वजनिक ठिकाणांबरोबरच शहरातील सार्वजनिक उद्यानांतही वेगळे चित्र दिसत नाही. तिथेही स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. या उद्यानांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांची वानवाच दिसून येत आहे. शासनाच्या महिला धोरणानुसार महिलांचा प्रवास लक्षात घेता दर एक किमी अंतरावर स्वच्छतागृहे उभारण्याचे आदेश आहेत.
या सर्वांचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. याबाबत ‘लोकमत’ने बारामतीतील महिलांशी संवाद साधला असता, अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. मुळातच हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यातच ग्रामीण भागातील महिला असो वा शहरातील तरुणी या विषयांवर बोलणे टाळतात. जर स्वच्छतागृहांचा वापर करायचा असेल, तर आम्ही घरी आल्यावरच वापर करतो.
सारखे स्वच्छतागृहाचा वापर नको म्हणून तर आम्ही भरपूर पाणी पित नाही, कधी कधी तर आम्ही फक्त स्वच्छतागृहांचा वापर करायचा असेल, तर आम्ही चक्क ‘उपाहारगृहांत’जातो, त्यासाठी कधी कधी आम्हाला
भरपूर पैसे खर्च करावे लागतात,
पण त्यापेक्षा आम्ही स्वच्छता नसल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहांचा
वापर कारणे टाळतो, अशा धक्कादायक प्रतिक्रिया या वेळी महिलांनी दिल्या.
...तर आरोग्यावर परिणाम
स्त्रीरोगतज्ज्ञांची याबाबत मते जाणून घेतली असता, बारामतीच्या महिला रुग्णालयातील डॉ. रेश्मा पाटील यांनी जर वेळेवर लघवीला गेले नाही किंवा जर ती साठून राहिली, तर त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हे वारंवार होत असेल, तर यामुळे ‘किडनीस्टोन’ होण्याची भीती निर्माण होऊ शकते. तर, बारामतीतील प्रसूतितज्ज्ञ डॉ. माधुरी मोकाशी यांच्या मते लघवी हे ‘वेस्टज’ असल्याने लघवी साठवून ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.
योग्य दखल घेणार...
मात्र, अनेक बाबतीत मागास राहिलेल्या महिला बऱ्याचदा आपल्या आरोग्यबाबतीत उदासीन असतात. मात्र, नगरपालिकाही याबाबत उदासीन असल्याचे जाणवते. मुख्याधिकारी दीपक झिंझाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत चौकशी करून योग्य ती दखल घेतली जाईल, असे सांगितले.
टाकीला गळती
शहरात शारदा प्रांगणात दोन, तर गणेश भाजी मंडईत तीन ‘युरेनिल्स’आहेत. या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे; तर काही स्वच्छतागृहांची दारे उघडी आहेत. त्यामुळे वापर टाळला जातो.
४बारामती शहरामध्ये महिलांसाठी असणाऱ्या ‘युरेनिल्स’ची संख्या फक्त पाच आहे, तर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या २२२ आहेत.
४बारामतीची लोकसंख्या १ लाख ९ हजार २८२ आहे. यात पुरुष ५५ हजार ९५३ आहेत, तर स्त्रियांची संख्या ५३ हजार २२६ आहे.
४या तुलनेत या ‘युरेनिल्स’चे प्रमाण
नगण्य आहे. त्यातच या संख्येत बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थिनी तसेच महिलांची भर पडते.