महिलांनी केली बक्षिसांची लयलूट

By Admin | Updated: December 24, 2015 00:36 IST2015-12-24T00:36:15+5:302015-12-24T00:36:15+5:30

लोकमत सखी मंच व संस्कार आयुर्वेद आयोजित ‘उत्सव सखींचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही महिलांनी आनंद लुटला.

Women's rewards won | महिलांनी केली बक्षिसांची लयलूट

महिलांनी केली बक्षिसांची लयलूट

पिंपरी : लोकमत सखी मंच व संस्कार आयुर्वेद आयोजित ‘उत्सव सखींचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही महिलांनी आनंद लुटला. क्रांती मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम झाला. महिलांनी या खेळात सहभाग घेऊन बक्षिसांची लयलूट केली. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर कार्यक्रम झाला.
या खेळात संगीताच्या तालावर डोक्यावर एक व कंबरेवर एक हात ठेवून पळायचे व थांबल्यानंतर पंचांनी घोषित केलेल्या आकड्यानुसार संघ बनवायचे, अशा या गमतीशीर खेळात महिलांनी मनमुराद आनंद लुटला. नृत्य स्पर्धेलाही महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक खेळातून निवडलेल्या विजेत्या महिलांमध्ये अंतिम फेरीत घेण्यात आली.
या फेरीत १२ महिला होत्या. अंतिम फेरीत महिलांना डोक्यावर पाण्याची भरलेली बाटली घेऊन तिचा समतोल राखत चालत ठरावीक अंतर पार करण्यास सांगण्यात आले. यातून तीन महिलांचे क्रमांक काढण्यात आले. त्या तिन्ही विजेत्या महिला पैठणीच्या मानकरी ठरल्या. यामध्ये प्रथम क्रमांक सोनम वामनकर, द्वितीय क्रमांक शोभा धुमाळ, तर तृतीय क्रमांक आशा शेंडगे यांनी पटकाविला. गायत्री सिल्क आणि पैठणीचे संचालक अमोल रोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी देण्यात आली.
उत्कृष्ट उखाण्यासाठी प्रिया कुलकर्णी यांना पायातील चांदीची जोडवी देण्यात आली. लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेत्या श्यामल कुलकर्णी यांना सोन्याची नथ व कल्याणी वाकडकर यांना चांदीचे जोडवे देण्यात आले. ही बक्षिसे दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या वतीने देण्यात आली. अंतिम फेरीतील सर्व सहभागी महिलांना संस्कार ग्रुपच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
या सोहळ्यात सोमवारी जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांना जागृत करण्यासाठी संजीवनी महिला पथकाचा ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून महिलांना नेत्रदान, अन्नदान, रक्तदान, याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा योग्य वापर करा असे अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. संजीवनी महिला पथकामध्ये सुजया कुलकर्णी, प्रचिती भिष्मुरकर, लीना देशपांडे, कीर्ती मराठे, स्मिता बांधिवडेकर, शुभांगी भोपे, अपर्णा भोपे, शीतल कापशीकर, सिद्धी कापशीकर या महिलांनी सहभाग नोंदविला. त्यांनी पोवाडा, भारुड, शिवाजी जन्म, पाळणा, अंगाई गीत या गीतांच्या माध्यमातून महिलांना जागृत केले. गेल्या पाच वर्षांपासून या पथकाची धुरा वनिता मोहिते या सांभाळत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फिरोज मुजावर यांनी त्यांच्या सोबतच्या कलाकारांसह लावण्या सादर केल्या.
मंगळवार, दि. २२ डिसेंबरला कोको फेस्टिव्हलच्या शेवटच्या दिवशी शाळेत येणारी मुले व गुरुजी यांच्या संवादावर आधारित ‘घंटा शाळेची’ हे हास्यविनोदी नाटक सादर करण्यात आले. शाळेत जाणाऱ्या मुलांना मोबाइल देणे कितपत योग्य आहे. एवढ्या लहान वयात मोबाइल दिल्यावर त्याचे काय परिणाम होतात. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपच्या वापरामुळे मुले गुरुजींना कशी उद्धट उत्तरे देतात, हे या नाटकाद्वारे दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी असे वागू नये म्हणून पालकांना नाटकातून संदेश दिला आहे.
५ मुले, २ मुली व गुरुजी अशा ८ कलाकारांनी यात काम केले. प्रमुख भूमिका नाटकाचे दिग्दर्शक गणेश रणदिवे यांनी केली आहे. नाटकाचे निर्माते सुनील टाटिया, तर लेखक राजेश लोंढे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Women's rewards won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.