चाकण नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: April 29, 2017 03:56 IST2017-04-29T03:56:08+5:302017-04-29T03:56:08+5:30
महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टी परिसर ‘हगणदरीमुक्त’ करण्यासाठी चाकण नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये

चाकण नगर परिषदेवर महिलांचा मोर्चा
आसखेड : महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टी परिसर ‘हगणदरीमुक्त’ करण्यासाठी चाकण नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेली फिरती शौचालये बुधवारी (दि. २५) बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर मोर्चा आणून संबंधित फिरती शौचालये परत सुरू करावीत, अशी मागणी केली.
या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. चाकणमधील महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टीत सुमारे २४४ कुटुंबे राहतात. संबंधित झोपडपट्टी नियमित नसल्याच्या कारणास्तव येथे गेल्या अनेक वर्षांत ग्रामपंचायत कार्यकाळात काहीही मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या.
नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर या भागातील एका सदस्याला नगर परिषदेच्या कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळाले. त्यानंतर येथील शौचालयांची प्रमुख मागणी पुढे आल्यानंतर नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने मागील वर्षभरापासून येथे सुरुवातीला ४० व नंतर सुमारे ३० फिरती शौचालये कायमस्वरूपी उपलब्ध करून दिली होती. संबंधित फिरत्या ३० शौचालयांचा महिन्याचा खर्च तीन लाख रुपयांहून अधिक असल्याने तो नगर परिषदेला डोईजड झाला
होता. अखेरीस महात्मा फुलेनगर येथील झोपडपट्टी परिसराचे सर्वेक्षण करून सुमारे ५० कुटुंबांना मागील महिन्यात पक्क्या शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी
१० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते.
प्रत्यक्षात संबंधित कुटुंबीयांनी अद्याप शौचालये बांधलीच नाहीत. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने बुधवारी फिरती शौचालये बंद करण्याचा निर्णय घेतला. यास संबंधित भागाच्या नगरसेविका सुरेखा गालफाडे, महेंद्र गालफाडे, आरपीआयच्या महिला आघाडीच्या सुनंदा बनसोडे यांच्यासह नागरिकांनी कडाडून विरोध करीत नगर परिषदेवर मोर्चा आणला.
आमच्या भागातील फिरती शौचालये बंद करू नका, पाणी व अन्य समस्या तातडीने सोडवा, अशा मागण्या या वेळी केल्या. नगरसेवक सुदाम (भाऊ) शेवकरी, प्रकाश भुजबळ, जहीर शेख यांनीही संबंधित शौचालये सुरूच ठेवण्याची मागणी मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे केली. याबाबतची निवेदने मुख्याधिकारी साबळे यांना देण्यात आली. (वार्ताहर)