महिला आयोगाने पालिकेला फटकारले
By Admin | Updated: August 12, 2014 03:40 IST2014-08-12T03:40:21+5:302014-08-12T03:40:21+5:30
कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविरुद्ध एका महिला अधिकाऱ्याने कार्यालयांतर्गत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने राज्य महिला आयोगाने पुणे महापालिकेला फटकारले आहे

महिला आयोगाने पालिकेला फटकारले
पुणे : कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाविरुद्ध एका महिला अधिकाऱ्याने कार्यालयांतर्गत तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने राज्य महिला आयोगाने पुणे महापालिकेला फटकारले आहे. या महिलेला विभागाचा प्रमुखच त्रास देत होता. महिला आयोगाने पालिका आयुक्तांना संबंधित महिलेला दुसऱ्या प्रमुखच्या अंतर्गत काम करण्यास सांगावे, असे आदेश दिले आहेत. आयोगाने २६ मे रोजी पत्र देऊन ७ दिवसांत आदेश अमलात आणण्यास सांगितले असतानाही पालिकेने २ महिने हा आदेशच झुलत ठेवला होता. शेवटी आदेश मानत पालिकेने संबंधित महिलेचे कामकाज अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली करण्यास मान्यता दिली आहे.
कार्यालयात महिलांच्या होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध कायदा आणला. त्यांतर्गत
प्रत्येक शासकीय, खासगी कार्यालयात महिला तक्रार
निवारण समिती नेमण्याचे आदेश आहेत.
अधिकारी पदावर काम
करणाऱ्या महिलेने आपल्याविरोधातील छळाची
तक्रार या समितीकडे मांडली होती. मात्र, तेथे दखल न घेतल्याने थेट राज्य महिला आयोगाचे दरवाजे ठोठावले. आयोगाने या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यास सुरुवात केली.
संबंधित महिला आणि पालिका आयुक्तांना हजर होण्याचे आदेश आयोगाने वेळोवेळी दिले. पण, आयुक्त काही आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे या महिलेला दुसऱ्या प्रमुखांच्या अंतर्गत काम करण्यास सांगावे, असा आदेश पालिका आयुक्तांना दिला. हा आदेश २६ मे २०१४ ला देण्यात आला. त्यात स्पष्ट नमूद करण्यात आले होते, की ७ दिवसांत ही कार्यवाही करण्यात यावी. पण, तब्बल २ महिने हा आदेश पालिकेकडून झुलत ठेवण्यात आला. पण आयोगाच्या पुढे जाता येत नसल्याने शेवटी नाइलाजाने आयोगाच्या आदेशानुसार संबंधित तक्रारदार महिलेला दुसऱ्या प्रमुखाच्या अंतर्गत काम करण्यास सांगण्यात आले आहे.