स्वच्छतागृहांमुळे महिलांना दिलासा
By Admin | Updated: December 24, 2015 00:55 IST2015-12-24T00:55:54+5:302015-12-24T00:55:54+5:30
महिला, तरुणी खरेदीसाठी बाहेर पडल्या, की किमान अर्धा दिवस तरी खर्च होतो. आजूबाजूला स्वच्छतागृहांची सोय असेल तर दिलासा मिळतो. शहरातील काही बाजारपेठांमध्ये त्यांची कुचंबणा होत

स्वच्छतागृहांमुळे महिलांना दिलासा
पुणे : महिला, तरुणी खरेदीसाठी बाहेर पडल्या, की किमान अर्धा दिवस तरी खर्च होतो. आजूबाजूला स्वच्छतागृहांची सोय असेल तर दिलासा मिळतो. शहरातील काही बाजारपेठांमध्ये त्यांची कुचंबणा होत असली तरी बहुतांश ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले.
महिला खरेदीच्याबाबतीत अत्यंत चोखंदळ, चौकस असतात. त्यामुळे लहान-मोठ्या कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना घासाघीस करणे, दर्जा तपासून पाहणे यामध्ये त्यांचा बराच वेळ जातो. भरपूर खरेदी करायची असल्याने कधी चार-पाच तास, तर कधी पूर्ण दिवस बाहेर जातो. अशा वेळी स्वच्छतागृहांमध्ये जाणे अपरिहार्य असते. बाजारपेठा, शॉपिंग मॉलच्या परिसरात स्वच्छतागृहांची सोय असेल तर महिलांची कुचंबणा होत नाही. मात्र, अशी व्यवस्था नसेल तर मात्र त्यांना घरी जाईपर्यंत संयम राखण्याशिवाय पर्याय नसतो.
तुळशीबाग
तुळशीबागेत फेरफटका मारला असता दिवसभर अमाप गर्दी पाहायला मिळते. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दुकाने सुरू असेपर्यंत हे स्वच्छतागृह खुले असते. महिला आणि पुरुषांकडून तीन रुपये शुल्क आकारले जाते. येथे चोवीस तास पाण्याची सोय आहे. तसेच, दररोज साफसफाई केली जाते. त्यामुळे येथे जाणे सोयीचे होते, असे मत महिलांनी व्यक्त केले. तुळशीबागेतून बाहेर पडल्यावर विश्रामबाग वाड्याच्या बाजूला महापालिकेचे स्वच्छतागृह आहे. बसथांब्यावरील महिलांना ते उपयुक्त ठरते.
बिझी लँड कॉम्प्लेक्स
कुमठेकर रस्त्यावरील बिझी लँड कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर कपड्यांची दुकाने आहेत. वरील मजल्यांवर टेलरची दुकाने आहेत. दररोज बऱ्याच महिला व तरुणी खरेदीसाठी, ड्रेस शिवायला देण्यासाठी येथे येतात. तसेच, येथील अनेक दुकानांमध्ये महिला कर्मचारी दिवसभर राबत असतात. त्यांच्या सोयीसाठी प्रत्येक मजल्यावर एक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या स्वच्छतागृहांची दररोज स्वच्छता ठेवली जाते. तसेच, खरेदीसाठी आलेल्या महिलांना स्वच्छतागृह नेटकेपणे वापरण्याच्या सूचना दिल्या जातात.
क्लोव्हर सेंटर, कॅम्प
कँप भागातील क्लोव्हर सेंटरमध्येही वरच्या मजल्यावर स्वच्छतागृहाची सोय आहे. मात्र, खरेदीसाठी बाहेरून आलेल्या महिलांना या स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी तेथील महिला कर्मचाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. येथील स्वच्छतेबाबत मात्र अनेक महिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दररोज स्वच्छता केली जात असल्याचीही काही महिलांनी तक्रार केली. अस्वच्छतेचा त्रास होऊ नये, यासाठी अनेक जण समोरच असलेल्या एसजीएस मॉलमध्ये फेरफटका मारायला जातात. तेथील स्वच्छतागृहाचा वापर करतात.
हाँगकाँग लेन
फर्ग्युसन रस्त्यावरील हाँगकाँग लेनमध्ये सर्व नव्या ट्रेंडच्या वस्तू, अॅक्सेसरीज, कपडे उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे महाविद्यालयीन तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, जागेअभावी या ठिकाणी स्वच्छतागृहाची कोणतीही सोय नाही. येथील ग्राहक, दुकानदार आर डेक्कन मॉलमध्ये जाऊन, तर कधी डेक्कन जिमखान्यावरील स्वच्छतागृहाचा वापर करतात. दर वेळी मॉलमध्ये जाणे शक्य नसल्याने बसस्थानकाच्या स्वच्छतागृहामध्ये जावे लागते. मॉल येथे स्वच्छतेच्या नावाने ठणठणाट असल्याचे मत दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.