महिलेला मारहाण करून दागिने पळविले
By Admin | Updated: August 8, 2015 00:46 IST2015-08-08T00:46:11+5:302015-08-08T00:46:11+5:30
काऱ्हाटीत भरदुपारी दुकानात शिरून अंगावरील दागिने चोरून महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर चोरटे पळून गेले. परिसरात

महिलेला मारहाण करून दागिने पळविले
काऱ्हाटी : काऱ्हाटीत भरदुपारी दुकानात शिरून अंगावरील दागिने चोरून महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर चोरटे पळून गेले. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हे शोध पथक बारामती व वडगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
काऱ्हाटी (ता. बारामती) येथील विशाल लडकत यांच्या किराणा दुकानात त्यांच्या पत्नी लता लडकत या दुकानात पॅकिंग करीत होत्या. या वेळी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी व्यक्ती आली.
त्याने दुकानात काही वस्तूंची मागणी केली. लता सामान देण्यासाठी मागे वळल्या असता चोरट्याने दुकानात शिरून लता यांना बेदम लाथांनी मारहाण केली. पाठीमागून हल्ला झाल्याने लता खाली पडल्या. या वेळी चोरट्याने पाठीवर, पायावर बेशुद्ध पडेपर्यंत त्यांना मारहाण केली. तसेच, कानातील, गळ्यातील दागिने, पायातील जोडवी व दुकानातील रोकड लंपास केली.
बेशुद्धावस्थेत पडलेल्या लता यांना दुकानात आलेल्या महिलेने पाहिले. लडकत यांना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भरदिवसा हा प्रकार घडल्याने गावात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)