या महिलांना कायाकल्प संस्थेने आम्ही पैसे देणार, असे सांगून त्यांच्याकडून माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर त्यांच्याकडून त्यातील १० हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, हे अनुदान आपल्याला नाही तर देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी होते, अशी माहिती अनुदान मिळालेल्या काही महिलांना मिळाली. त्यानंतर त्या महिला तक्रार करण्यासाठी दत्तवाडी पोलिसांकडे गेल्या. दत्तवाडी पोलिसांनी याची माहिती महसूल विभागाला दिली. त्यानंतर नायब तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी याची चौकशी केली. त्यांनी अनुदान मिळालेल्या ५२ महिलांना भेटून याची माहिती घेतली. त्यात त्यांची फसवणूक कायाकल्प संस्थेने केलेल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे.
...... नको आम्हाला असले अनुदान
आपल्याला मिळालेले शासनाचे अनुदान हे कोरोना काळात कामधंदा नसल्याबद्दल नाही तर देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी असल्याचे समजल्यावर या सर्व महिला संतप्त झाल्या आहेत. आम्ही स्वाभिमानाने काम करून जगत आहोत, असे काम आम्ही कधी करत नाही. त्यामुळे हे अनुदान आम्हाला नको, उरलेले ५ हजार रुपयेही परत घ्या, अशी मागणी या महिलांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील ५ हजार २९६ वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना अनुदान
शासनाने जिल्ह्यातील ५ हजार २९६ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ७ कोटी ९४ लाख ४० हजार रुपये दोन टप्प्यांत वितरित केले आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला असल्याचे दाखवून पुण्यातील एकाच भागातील ५२ महिलांना अनुदान देऊन त्याद्वारे फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शासनाने दिलेले अनुदान हे खरोखरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचले का, याविषयी शंका उपस्थित झाली आहे.