पुणे :काँग्रेसच्या माजी महिला शहराध्यक्ष व विद्यमान प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्ष आवश्यक ते काम करताना दिसत नाही, काम करणाऱ्याला न्याय दिला जात नाही, याची खंत व्यक्त करत मारणे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामापत्र पाठवले आहे. पक्षाची शहरातील महिला आघाडीही निष्प्रभ झाली आहे.
मारणे सध्या प्रदेश महिला सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्याआधी त्या पुणे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्यांना अचानक पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांची नियुक्ती प्रदेश शाखेत करण्यात आली. सन २०११ पासून त्या पक्षाचे काम करत आहेत. शनिवारी अचानक त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम केले जात नाही, काम करणाऱ्याला संधी दिली जात नाही, अशी कारणे त्यांनी राजीनामा पत्रात दिली आहेत.
पक्षाच्या शहर महिला आघाडीला विधानसभा निवडणुकीपासून शहराध्यक्ष नाही. महिला आघाडीसाठी असलेले काँग्रेस भवनमधील दालन अनुसूचित जातिजमाती विभागाला देण्यात आले. त्यामुळे शहरातील काँग्रेस महिला आघाडीची अवस्था अध्यक्षही नाही व कार्यालयही नाही, अशी झाली आहे. त्यावर जुन्या महिला नेत्यांकडून टीका होत असूनही पक्षाने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे दिसते आहे.