लावण्यांवर महिलांनी धरला ताल

By Admin | Updated: January 20, 2015 01:00 IST2015-01-20T01:00:48+5:302015-01-20T01:00:48+5:30

या रावजी बसा भावजी’, ‘इचार काय हाय तुमचा’, ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’... अशा विविध मराठमोळ्या ठसकेबाज लावण्यांवर ताल धरत सखींनी लावणी महोत्सवात रंगत आणली.

Women have taken Dhola rhythm | लावण्यांवर महिलांनी धरला ताल

लावण्यांवर महिलांनी धरला ताल

पुणे : ‘या रावजी बसा भावजी’, ‘इचार काय हाय तुमचा’, ‘तुझ्या उसाला लागल कोल्हा’... अशा विविध मराठमोळ्या ठसकेबाज लावण्यांवर ताल धरत सखींनी लावणी महोत्सवात रंगत आणली. ढोलकीच्या तालावर थिरकलेले पाय अन् त्या जोडीला शिट्ट्यांची बरसात करीत या सखींनी लावण्यांचा मनमुराद आनंद लुटला.
निमित्त होते लोकमत सखी मंच व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. यांच्यातर्फे खास सखींसाठी आयोजित लावणी महोत्सवाचे... गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या लावणी महोत्सवात राज्याच्या प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सहभागी झाल्या होत्या. त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी लावणीप्रेमी महिलांनीही तुडुंब गर्दी केली होती.
माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे, स्वाती दसवडकर, अक्षदा मुंबईकर, तृप्ती पोतदार, वैभवी मुंबईकर या लावणीसम्राज्ञींनी महोत्सवात आपल्या नृत्याने उपस्थित महिलांनाही ताल धरायला लावले.
गण, गवळण व मुजऱ्याने महोत्सवाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुढील तीन तास गणेश कला क्रीडा मंचमध्ये केवळ सखींचा आव्वाज होता. खुटेगावकर यांनी ‘इचार काय हाय तुमचा’ या लावणीने उपस्थित सखींच्या डोक्यातील इतर सर्व विचार बाजूला सारून केवळ लावणीचा आस्वाद घेण्यास भाग पाडले. ‘बाय मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची’ या लावणीला तर महिलांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. खुटेगावकर यांची अदाकारी आणि स्वाती शिंदे यांच्या ठसकेबाज गायकीला तीन वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला. या लावणीवर सखींनी नाचण्याचा उत्स्फूर्त आनंद लुटला, तसेच त्यांना दादही दिली.
अर्चना जावळेकर यांनी सादर केलेल्या ‘या रावजी बसा भावजी’ या लावणीनेही सखींची मने जिंकली. लावण्यांबरोबरच कोळीगीतांवर त्याच स्टाइलमध्ये नृत्य करण्याचा आस्वाद घेतला.
संदीप म्हस्के व संतोष चव्हाण यांनी ढोलकीवर धरलेला ताल वाहवा मिळवून गेला. तर सूत्रसंचालक विशाल चव्हाण यांनी आपल्या दिलखेच संवादांनी महोत्सवाची रंगत वाढविली. दीपक पवार यांनी संगीत संयोजन केले.
(प्रतिनिधी)

४लोकमत शॉपिंग उत्सवानिमित्त चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.चे संचालक सिद्धार्थ शहा यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. या वेळी जाहिरातप्रमुख सुनील चाणेकर हेदेखील उपस्थित होते.
४लकी ड्रॉमध्ये सोन्याची नथ देण्यात आली.
४या वेळी काढण्यात आलेल्या ड्रॉमधील विजेत्या : १) नीलिमा देडगे २) सीमा मोघे ३) पूनम सानप ४) शैला माडके ५) पुष्पा कुंभार.

Web Title: Women have taken Dhola rhythm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.