गोलेगाव दर्ग्यात महिलांना प्रवेश
By Admin | Updated: February 1, 2017 04:35 IST2017-02-01T04:35:16+5:302017-02-01T04:35:16+5:30
गोलेगावचे ग्रामदैवत दावलमलीक येथे मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यात आला. तसेच बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांनी रचलेल्या आरतीचीही सुरुवात करण्यात

गोलेगाव दर्ग्यात महिलांना प्रवेश
गोलेगाव : गोलेगावचे ग्रामदैवत दावलमलीक येथे मुख्य गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यात आला. तसेच बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड यांनी रचलेल्या आरतीचीही सुरुवात करण्यात आली असून पहिल्या आरतीचा मान माया व विनायक महाजन या उभयतांना देण्यात आला.
निसर्गसंपन्न दावलमलीक टेकडीवर असणारा हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. एक जागृत देवस्थान असल्याची लोकांची भावना असल्यामुळे येथे नेहमीच पंचक्रोशीतील हिंदू व मुस्लिम भक्तांची वर्दळ असते. येथील उरूस चैत्र कृष्ण त्रयोदशीला असतो. गनिभाई तांबोळी हे सेवेकरी येथे सेवा करतात. तसेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे सात ते आठ वर्षांपासून या ठिकाणी पशुहत्या बंद केलेली आहे.
दर गुरुवारी एखादा दाता मिष्टान्नाचा महाप्रसाद या ठिकाणी देत असतो. अतिशय निसर्गसंपन्न वातावरणात टेकडीवर असलेल्या या ठिकाणावरून समोरचा घोडनदीवर बांधलेल्या चिंचणी धरणाचा पाण्याचा फुगवटा डोळ्यात साठवण्याजोगा आहे. मोर, हरीणही येथे हजेरी लावतात. नागमोडी वळणे घेत टेकडीवर चढणे म्हणजे एकप्रकारे सुखद अनुभवच वाटतो. पावसाळ्यात वाहणारे झरे व ओढे पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच एक पर्यटनाचे ठिकाण म्हणून ही टेकडी अलीकडच्या काळात नावारूपाला येत आहे.
गोलेगाव येथील तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण, सदस्या सुमन भोगावडे, कुमुदिनी बोऱ्हाडे, अनिता वर्पे, अर्चना पडवळ, वनिता जगदाळे, शैला गायकवाड या महिलांनी उपस्थितांसमोर दर्ग्यात प्रवेशाचा प्रस्ताव मांडला. त्याला ताबडतोब सरपंच अनुपमा वाखारे, उपसरपंच सुनील भोगावडे व उपस्थितांनी मान्यता दिल्याने एक ऐतिहासिक क्षण असल्याची भावना महिला कार्यकर्त्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी गोलेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भगतसिंग वाखारे, बबन वाखारे, दिलीप लोखंडे, शरद भोगावडे, संतोष वर्पे, सुनील पडवळ, मच्छिंद्र गायकवाड, खंडू बोऱ्हाडे, तुळशीराम पवार, मच्छिंद्र सांगळे, नामदेव महाजन आदी उपस्थित होते.