निगडी : येथील अंकुश चौकात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकची धडक बसून सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. शांताबाई मुरलीधर काळे (वय ७०, आम्रपाली सोसायटी, ओटा स्कीम, निगडी) असे त्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे. निगडीतील अंकुश चौकात सकाळी साडेआठच्या सुमारास पायी चाललेल्या महिलेला ट्रकची ठोकर बसली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेस नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, त्या रुग्णवाहिका चालकाने जखमी महिलेला रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यानंतर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाची (वायसीएम) रुग्णवाहिका मागविण्यात आली. महापालिकेच्या रुग्णवाहिकेने तिला वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच ती मृत झाली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (वार्ताहर)
ट्रकच्या धडकने महिला ठार
By admin | Updated: April 26, 2016 02:10 IST