दारूविक्रेत्यांकडून महिलेला मारहाण
By Admin | Updated: January 28, 2015 02:29 IST2015-01-28T02:29:56+5:302015-01-28T02:29:56+5:30
विरोधात तक्रार दिल्याचा राग धरून येथील अंगणवाडी कार्यकर्तीला दारूविक्रेत्यांनी बेदम मारहाण केली. या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दारूविक्रेत्यांकडून महिलेला मारहाण
बारामती/माळेगाव : विरोधात तक्रार दिल्याचा राग धरून येथील अंगणवाडी कार्यकर्तीला दारूविक्रेत्यांनी बेदम मारहाण केली. या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माळेगाव (ता. बारामती) येथे प्रजासत्ताक दिनीच हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पद्मिनी ऊर्फ पद्मा शहाजी गव्हाणे, मुलगा अमोल शहाजी गव्हाणे आणि पती शहाजी भगवान गव्हाणे (रा. तिघेही माळेगाव बुद्रक, ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २६) पीडित अंगणवाडी कार्यकर्ती महिला ग्रामपंचायतीमधून खाऊ घेऊन अंगणवाडीकडे निघाल्या होत्या. याच वेळी पद्मा गव्हाणे ही महिला त्यांच्या दिशेने चालत आली. त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. याच वेळी अचानक पद्मा हिने पीडित महिलेच्या डोक्यावर खराटा मारला. तसेच, गव्हाणे हिचा मुलगा अमोल गव्हाणे, पती शहाजी गव्हाणे हे दोघे घरातून पळत आले. त्यांनी लाथ मारून त्यांना दुचाकीसह खाली पाडले. तसेच, लाकडी दंडुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांची साडीदेखील ओढून विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. मारहाण करून धमकी देण्याचा प्रकार सुरूच होता. हा प्रकार सुरू असताना परिसरातील महिला धावत आल्या. त्यांनी मारहाणीचा जाब विचारला. तसेच, आरोपींच्या ताब्यातून पीडित महिलेला सोडविण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेच्या सहकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या नीता भुजबळ या तेथे आल्यानंतर तिघेही घरात पळून गेले. त्यांनी घराचे दार बंद करून घेतले. भुजबळ आणि ग्रामस्थांच्या मदतीने पीडित महिलेने माळेगाव दूरक्षेत्रात जाऊन या प्रकाराची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली.
प्रजासत्ताक दिनीची अवैध दारूविक्रेत्यांनी सकाळी ७.१५ ते ७.३० दरम्यान भररस्त्यात उच्छाद मांडला. पोलिसांनी विनयभंग, रस्त्यात अडवून मारहाण करणे आदी प्रकरणी त्या तिघांवर कारवाई केली.
मारहाण प्रकरणातील तिसरा आरोपी अमोल गव्हाणे याला न्हावरे (ता. शिरूर) येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस कर्मचारी रमेश नागटिळक, संदीपान माळी यांनी छापा टाकून गणेशला त्याच्या नातेवाइकाच्या घरातून ताब्यात घेतले.
(वार्ताहर)