महिला आयकॉन्सना अक्षर सलाम
By Admin | Updated: March 20, 2016 04:43 IST2016-03-20T04:43:41+5:302016-03-20T04:43:41+5:30
एका प्रतिष्ठित महिलेने विविध क्षेत्रांत आपले भरीव योगदान केलेल्या महिलांचा केलेला सन्मान... इतर महिलांनी त्यांना दिलेली दाद...

महिला आयकॉन्सना अक्षर सलाम
पुणे : एका प्रतिष्ठित महिलेने विविध क्षेत्रांत आपले भरीव योगदान केलेल्या महिलांचा केलेला सन्मान... इतर महिलांनी त्यांना दिलेली दाद... आणि एकूणच स्त्री ही शक्ती नाही तर शक्ती ही स्त्री आहे, याचा उपस्थितांना आलेला प्रत्यय... असे वातावरण आज ‘लोकमत’च्या आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन) या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यात होते.
‘लोकमत’च्या वतीने या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन खासदार जया बच्चन यांच्या हस्ते झाले. या वेळी लोकमत मीडिया प्रा. लि.चे अध्यक्ष खासदार विजय दर्डा, खासदार अॅड. वंदना चव्हाण, अमर साबळे, प्रसिद्ध लेखिका शोभा डे, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, अनिल काटे एंटरप्रायझेसचे संचालक अनिल काटे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कोणी डॉक्टर, उद्योजिका, कोणी इंटेरिअर डिझायनर, बांधकाम व्यावसायिक आणि यांसारख्या इतर अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने स्वत:चे स्थान सिद्ध केलेल्या महिलांचा यानिमित्ताने ‘लोकमत’ने विशेष सन्मान केला.
समाजनिर्मितीसाठी काम करणाऱ्या या महिलांचा वाटा महनीय आहे. फक्त शब्दांतून त्यांचा सन्मान न करता कृतीतून करणे अधिक सयुक्तिक वाटते आणि म्हणूनच आयकॉन्सचा सोहळा आयोजित केला आहे, अशी भावना दर्डा यांनी व्यक्त केली.
उषा काकडे म्हणाल्या, ‘‘महिलांनी जिद्द व कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात नाव उंचावू शकतात. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली. त्यामुळेच आपण घराबाहेर पडून असा मुक्त संवाद साधत आहोत. यानिमित्ताने आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्याचबरोबर, स्व. वीणा दर्डा आणि स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून महिलांसाठी व्यासपीठ मिळवून दिले; त्यामुळे ‘लोकमत’चे विशेष आभार मानायला हवेत.’’
स्त्री घराबाहेर पडली आणि ती मल्टिटास्किंग झाली; मात्र पुरुषांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या, तरी पुरुषांकडून अद्यापही त्याचा स्वीकार झालेला दिसत नाही. हे चित्र बदलण्यासाठी समाजाची, पुरुषांची मानसिकता बदलायला हवी. यासाठी शाळांमधूनच मुलांना याचे शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी सर्व खासदारांनी एकत्र येण्याची गरज आहे.- वंदना चव्हाण, खासदार