अन साक्षीला पारितोषिक रक्कम मिळालीच नाही...
By Admin | Updated: October 7, 2016 04:10 IST2016-10-07T04:10:51+5:302016-10-07T04:10:51+5:30
रिओ आॅॅलिम्पिकमध्ये कुस्तीत देशाला पदक जिंकून देणारी पहिली महिला मल्ल ठरलेल्या साक्षी मलिकला पुणे महापालिकेतर्फे ५ लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले

अन साक्षीला पारितोषिक रक्कम मिळालीच नाही...
रिओ आॅॅलिम्पिकमध्ये कुस्तीत देशाला पदक जिंकून देणारी पहिली महिला मल्ल ठरलेल्या साक्षी मलिकला पुणे महापालिकेतर्फे ५ लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. ही घोषणा आॅलिम्पिक संपल्यानंतर पुढील आठवड्यात करण्यात आली होती. पुणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान तिला हे पारितोषिक देण्यात येणार होते. प्रत्यक्षात कार्यक्रमादरम्यान पारितोषिक मिळालेच नाही.
हे पारितोषिक तिला नंतर पाठविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले. याबाबत महापौर प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘साक्षीला ५ लाख देता येणार नाही. तिला नियमानुसार ३ लाख देता येईल, असे मनपा अधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या आदल्या दिवशी म्हणजे, बुधवारी (दि. ५) सांगितले. ही तांत्रिक बाब त्यांनी आधीच लक्षात आणून दिली असती तर असा प्रकार घडला नसता. आॅगस्टच्या अखेरीस साक्षीला हे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून बुधवारपर्यंत आम्हाला याबाबत काहीच सांगण्यात आले नव्हते. अशा पद्धतीची तांत्रिक अडचण होती, तर याआधी झालेल्या बैठकींमध्ये मनपा अधिकाऱ्यांनी ती लक्षात आणून देणे आवश्यक होते.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत साक्षीला ५ लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, हे खरे आहे. मात्र, इतकी रक्कम नियमानुसार देता येणार नाही. आपण ३ लाखांपर्यंतचीच रक्कम देऊ शकतो, असे महापालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला बुधवारी (दि. ५) कळविले. त्यानुसार साक्षीला आम्ही आजच धनादेश देणार होतो. मात्र, त्यावर सही करणारे अधिकारी रजेवर असल्याने आज हा धनादेश देता आला नाही. ही बाब साक्षीला कळविण्यात आली असून शासकीय पातळीवरील अडचण तिने समजून घेतली. लवकरच ही रक्कम तिला पोहचविण्यात येईल. शिवाय, उर्वरित रकमेसाठी आम्ही राज्य सरकारशी संपर्क साधणार आहोत.’’