बारामती : यापुढील काळात राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय कोणत्याही पक्षासाठी वाटचाल सुकर असणार नाही. कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करीत पक्ष संघटनेची बुथ पातळीपर्यंत बांधणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे केले. बारामती येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत जानकर बोलत होते. जानकर म्हणाले, सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मराठवाड्यासह नाशिक, अहमदनगर भागातील रासपचे कार्यकर्ते विजयी होत आहेत. याआधी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांत पक्षाने चांगले यश मिळविले आहे. राज्यभरात पक्षाचा विस्तार वाढत आहे. यावेळी त्यांनी, रासपच्या कार्यकर्त्यांनी अधिकारी,संस्थांना पक्षाचे लेटरपॅड वापरून नाहक त्रास देऊ नये, किंबहुना अशा पदाधिका-यांनी पक्षातच राहू नये. असा सज्जड दम दिला.यावेळी पक्षाचे राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले, उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे, आण्णासाहेब पाटील, नितीन धायगुडे, महिला अध्यक्षा श्रद्धा भातांब्रेकर, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष ताजुद्दीन मणेर जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, हरीष खोमणे,अमोल मारकड, अॅड. विक्रमसिंह पाटील, यासह विभागातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष,संपर्क प्रमुख उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्षाशिवाय कोणत्याही पक्षासाठी वाटचाल सुकर नाही - महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 19:03 IST