विप्रो हाॅस्पिटल दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:13+5:302021-04-06T04:11:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ...

विप्रो हाॅस्पिटल दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटल येत्या दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तातडीने ५ एमडी, १२ एमबीबीएस आणि ६३ बीएएमएस डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली असून आरोग्य कर्मचारीदेखील उपलब्ध करून दिले आहेत.
हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटलची क्षमता तब्बल ४३९ खाटांची असून सध्या येथे २८८ रुग्ण उपचार घेत आहे. दोन दिवसांमध्ये नवीन स्टाफ रुजू झाल्यानंतर रुग्णालयामध्ये सर्व खाटांवर रुग्णांवर उपचार केले जातील अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषेदेने हिंजवडीमध्ये रुग्णालय सुरू केले. पहिल्या लाटेत अनेक रुग्णांनी याठिकाणी उपचार घेतले. रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध असून, दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्याठिकाणी आवश्यक असलेले मनुष्यबळासाठी कंत्राटी स्वरूपात भरती केली जाणार आहे. विप्रो रुग्णालयामध्ये सध्या एमडी डाॅक्टर पाच, एमबीबीएस बारा, बीएएमएस ६३, नर्स ८१ शिवाय आणखी पन्नासपेक्षा अधिक नर्सची भरती केली जाणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले.
चौकट
ऑनलाइन कळणार खाटांची उपलब्धता
ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटांची संख्या, तसेच साध्या खाटा, ऑक्सिजन खाटा, आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर यांची माहिती आता ऑनलाइन मिळणार आहे. जिल्हा परिषदेने कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. येत्या दोन दिवसात ही यंत्रणा लोकांसाठी उपलब्ध होईल. नागरिकांना ऑनलाईन एका क्लिकवर खाटा उपलब्धता कळू शकेल. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली घुले यांनी ही माहिती दिली.