हिवाळ्यातही ‘माळशेज’च्या सौंदर्याची भुरळ
By Admin | Updated: January 14, 2017 03:05 IST2017-01-14T03:05:05+5:302017-01-14T03:05:05+5:30
माळशेज घाट म्हणजे फक्तपावसाळ्यातच पर्यटनासाठी पर्यटकांना भुरळ घालतो हा समज आता चुकीचा ठरू लागला आहे, कारण

हिवाळ्यातही ‘माळशेज’च्या सौंदर्याची भुरळ
खोडद : माळशेज घाट म्हणजे फक्तपावसाळ्यातच पर्यटनासाठी पर्यटकांना भुरळ घालतो हा समज आता चुकीचा ठरू लागला आहे, कारण आता हिवाळ्यातही माळशेज घाट पर्यटकांनी फुलू लागला आहे.
दिवाळी आणि नाताळच्या सुट्यांमध्ये माळशेज घाटात आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी होती तर इतर दिवशी शनिवार आणि रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशीही पर्यटक माळशेज घाटाला भेटी देत आहेत. सध्या कडाक्याची थंडी असतानाही काही पर्यटक अगदी सकाळपासूनच माळशेजमध्ये येऊन अंगावर कोवळं ऊन घेत पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील पर्यटकांना वर्षासहलीसाठी भुरळ घालणारा माळशेज घाट आता कात टाकू लागला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने माळशेज घाटात ठिकठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी याचा फायदा होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यायाने जुन्नर तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
माळशेज घाट निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर आहे. सध्या घाट परिसरात सुशोभीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असले असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ठिकाणी धोका मात्र कायम आहे. पर्यटक, वनस्पती अभ्यासक, पक्षिनिरीक्षक व संशोधकांना माळशेजची सफर म्हणजे पर्वणी ठरत आहे.
माळशेज घाट हा पावसाळ्याच्या दिवसात जेवढा विलोभनीय वाटतो तेवढाच धोकादायकही असतो ही वस्तुस्थिती जरी असली तरी विशेषत: पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला पाहावयास मिळतो.