पुणे - महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे समोर आले आहे. इच्छुकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. शिंदेसेनेकडून भाजपाकडे २० ते २५ जागांची मागणी केली आहे परंतु भाजपा इतक्या जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पुण्यातील गोखले रोड परिसरात गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पुणे शहरात फक्त ४ जण तिकीट वाटपाचा निर्णय घेत आहे. त्यात ते घरच्यांना उमेदवारी देत आहे. किमान २५ जागा पक्षाला सोडायला हव्यात परंतु घरातील लोकांचे बस्तान बसवण्यासाठी या लोकांनी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. पुण्यात भाजपाने शिंदेसेनेला १० ते १५ जागा देण्याची तयारी केली आहे मात्र शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून याला विरोध होत आहे. गेली अनेक वर्ष आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतोय. महायुती म्हणून लोकसभेला आम्ही काम केले, भाजपाला १०० टक्के यश मिळाले. विधानसभेतही काम केले तिथेही यश मिळाले मात्र आता महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर होणारे पक्षप्रवेश यावर बंदी आणली पाहिजे. जुने कार्यकर्ते मेहनत घेत आहेत असं सांगत पक्षाकडून डावलण्यात येत असल्याचा आरोप विभागप्रमुख महेंद्र जोशी यांनी केला.
तर पक्षाकडून ५०० इच्छुकांचे फॉर्म भरून घेण्यात आले. अर्ज भरताना कार्यकर्त्यांनी जी कामे केली त्यांचा अहवाल न बघताच बाजूला ठेवण्याचे काम केले. विजय शिवतारे जे ग्रामीणमध्ये काम करतात. त्यांना पुणे शहराचे काहीच माहिती नाही. अहवाल पाहतही नव्हते. भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार आहे का? शिवसेनेला ताकद देण्याचं काम तुम्ही करताय की खच्चीकरण करण्याचे काम करताय असा सवाल संतप्त शिवसैनिकांनी विजय शिवतारे, प्रमोद भानगिरे, नीलम गोऱ्हे यांना विचारला आहे.
दरम्यान, ज्या भागात नीलम गोऱ्हे राहतात तिथे आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक बनला नाही. कारण त्यांनी कधी शिवसेना वाढूच दिली नाही. सगळ्या गोष्टी व्यवहाराने त्या करतात. मागील २०-२५ वर्ष आम्ही शिवसेनेचे काम करतो. आमच्या लोकांना भाजपाच्या दावणीला बांधण्याचे काम नेते करतात. पक्षात काय सुरू आहे हे शिवसैनिकाला कळू द्या अशी मागणी गोऱ्हे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केली.
Web Summary : Shinde Sena workers protested in Pune against unfair seat allocation in the upcoming municipal elections. They allege favoritism and accused leaders of prioritizing personal gains over loyal party members, questioning if the party is being run at BJP's behest.
Web Summary : आगामी नगर पालिका चुनावों में अनुचित सीट आवंटन के खिलाफ शिंदे सेना के कार्यकर्ताओं ने पुणे में विरोध प्रदर्शन किया। उन्होंने भाई-भतीजावाद का आरोप लगाया और नेताओं पर वफादार पार्टी सदस्यों पर व्यक्तिगत लाभ को प्राथमिकता देने का आरोप लगाया, यह सवाल करते हुए कि क्या पार्टी भाजपा के कहने पर चल रही है।