पळसनाथाच्या शिल्पसौंदर्याचे जतन होणार का?

By Admin | Updated: May 23, 2016 01:55 IST2016-05-23T01:55:39+5:302016-05-23T01:55:39+5:30

उजनी जलाशयात गडप झालेल्या पळसनाथ मंदिराचा पुरातनकालीन ठेवा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. उजनी जलाशयात पाणी आल्यावर मंदिराचे अस्तित्व पुसले जाते

Will the shelter ship be saved? | पळसनाथाच्या शिल्पसौंदर्याचे जतन होणार का?

पळसनाथाच्या शिल्पसौंदर्याचे जतन होणार का?

रविकिरण सासवडे,  बारामती
उजनी जलाशयात गडप झालेल्या पळसनाथ मंदिराचा पुरातनकालीन ठेवा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. उजनी जलाशयात पाणी आल्यावर मंदिराचे अस्तित्व पुसले जाते. वर्षातील १२ महिने हे मंदिर पाण्याखाली असते. तीव्र दुष्काळाच्या काळातच मंदिर पाहावयास मिळते. पाण्याखाली राहूनदेखील मंदिराची वास्तू उजनीच्या लाटांना तोंड देत भक्कमपणे उभी आहे. हा पुरातन कालीन ठेवा जतन होणार का? असा सवाल येथे भेट देणाऱ्या शिल्पप्रेमी पर्यटकांसह, इतिहास संशोधकांमधून विचारला जात आहे.
१९७८ साली उजनी जलाशय पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर कायमस्वरूपी पाण्याखाली गेले. तसेच पळसदेव हे गावदेखील पाण्याखाली गेले. मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर नवीन वसलेल्या गावात पळसनाथाचे मंदिर बांधण्यात आले.
धरणात बुडालेल्या मंदिरातील शिवलिंग या नवीन मंदिरात स्थापन करण्यात आले. त्यामुळे येथील देव वाचला, पण देवाचे घर कायमस्वरूपीच पाण्यात बुडाले.
अप्रतिम कलाकुसर
असणारे पळसनाथाचे हे मंदिर यादवकालीन हेमाडपंती प्रकारातील आहे. मंदिराचे शिखर, गाभारा, सभामंडप, खांब आजही सुस्थितीत आहेत. सभामंडपाच्या खांबांवरील साखळीचे कोरीवकाम थक्क करणारे आहे. सभामंडपाच्या बाहेरील भिंतीवरील कोरीव नक्षीकामही अप्रतिम आहे. मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणात तर शिखर चपट्या भाजक्या विटांमध्ये बांधलेले आहे.
शिखराच्या एकदम अग्रभागी असणारे सहस्र कमळदेखील आपले सौंदर्य ताठ मानेने दाखवत उभे आहे. मंदिराच्या आवारामध्ये
ओवऱ्या, सतीशिळा, चारी बाजूंनी कोरलेल्या विरगळ, भग्न झालेली मारुतीची सुमारे ५ फूट उंच मूर्ती, भंगलेला नंदी व त्यावर एक बसलेली मानवाकृती, मंदिराच्या पाठीमागील बाजूस भग्न झालेली शंकर पार्वतीची मूर्ती, तर तटबंदीला असणारे ढासळलेले प्रवेशद्वारही दिसते.
- आणखी छायाचित्रे/८मुख्य मंदिराच्या शेजारीच आणखी एक हेमाडपंती मंदिर उभे आहे. येथील स्थानिक नाविक पोपट नगरे यांनी हे बळीश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले. या मंदिराची अवस्था मात्र वाईट झाली आहे. मंदिराच्या मोठमोठ्या शिळा ढासळलेल्या आहेत तर काही ढासळण्याच्या स्थितीत आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाहेरच्या बाजूस ‘आॅरगन’सारखी रचना असणाऱ्या कोरीव शिळा आहेत. या शिळा वाजवल्यास त्यामधून सात प्रकारचे स्वर ऐकू येतात. थक्क करणारी ही वास्तुरचना आणि त्यामागील शास्त्र यांना सलाम करावासा वाटतो. सभामंडपाच्या एका खांबावर प्राचीन शिलालेख आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार ठरलेल्या वास्तू आहेत. या वास्तू इतिहासाच्या आठवणी ताज्या करणाऱ्या आहेत. मात्र, या ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, किल्ले, वाडे दुर्लक्षित राहिल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा.....मंदिर यंदाच्या दुष्काळात संपूर्ण उघडे पडले आणि आपसुकच इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटकांची पावले पळसदेवकडे वळली. येथे येणारा प्रत्येक जण ही नखशिखांत सौंदर्याने नटलेली मंदिरे पाहून हळहळ व्यक्त करत आहे. येथील स्थानिक पोपट नगरे यांच्यासारखे नाविक डोळ्यात पाणी अणून ‘साहेब, ही मंदिरे वाचतील का हो’ म्हणून विचारणा करतात.

Web Title: Will the shelter ship be saved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.