पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. येथील प्राधिकरण, निगडी, आकुर्डी, चिंचवडगावातील काही भाग भाजप आणि राष्ट्रवादीचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जात असले, तरी आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार टक्कर देण्याची तयारी चालवली आहे. महायुतीने महापालिका निवडणूक एकत्रित लढवली तर बंडखोरी फोफावेल, असे चित्र आहे.
पिंपरी मतदारसंघ सामाजिकदृष्ट्या मिश्र रचनेचा आहे. प्राधिकरण, चिंचवडगाव, पिंपरीगाव परिसरातील उच्चभ्रू मतदारांसोबत झोपडपट्टी आणि कामगार वर्गातील मतदार येथे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे जातीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित मतदान प्रत्येक निवडणुकीत होते. भाजपचे संघटन बळकट असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नव्या मैत्रीचे परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळू शकतात. सध्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण आघाडी विरुद्ध युती असे झाले असून, त्यात आणखी उलथापालथ होऊ शकते.
उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा कस लागणार?
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातील सात प्रभागांत भाजपचे १३, राष्ट्रवादीचे १२, शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. त्यात बहुतांश प्रभागांमध्ये भाजप-राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी ठरले होते. परंतु, सध्याची राजकीय परिस्थिती २०१७ पेक्षा पूर्णतः वेगळी आहे. आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजूनही टिकून आहे; तर महाविकास आघाडीही लोकसभा, विधानसभेनंतर अधिक संघटित झाली आहे. आता फक्त महापालिका निवडणुकीत बनसोडे विधानसभेसारखा करिष्मा दाखवणार की फक्त मुलाला निवडून आणण्यात समाधान मानणार, हे दिसणार आहे.
भाजपचा मजबूत गड, पण विरोधक सज्ज
भाजपकडे माजी उपमहापौर हिरा (नानी) घुले, सुजाता पालांडे, संदीप वाघेरे, जयश्री गावडे, आशा शेडगे, शैलजा मोरे, विजय शिंदे अशी स्थानिक स्तरावर प्रभावी नेत्यांची फळी आहे. हे सर्व माजी नगरसेवक किंवा पक्षाचे जुने कार्यकर्ते असल्याने संघटनात घट्ट पकड आहे. मात्र भाजपसमोर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गटबाजी आणि कार्यकर्त्यांतील असंतोष आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना युतीने निर्माण केली नवी गणिते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पिंपरीत पक्षास बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष योगेश बहल, राजू मिसाळ, डब्बू आसवाणी, उषा वाघेरे, शाम लांडे, वैशाली काळभोर या नेत्यांमुळे पक्षाची स्थानिक संघटना पुन्हा सक्रिय झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत (धर) यादेखील याच मतदारसंघातील असून, विधानसभा निवडणुकीत त्यांनी अण्णा बनसोडे यांना कडवी टक्कर दिली होती.
दरम्यान, माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी आता भाजपविरोधी समीकरण अधिक मजबूत केले आहे. त्यांच्या सोबत असलेले माजी आमदार गौतम चाबुकस्वार हेही या मतदारसंघातील समीकरणांवर प्रभाव टाकू शकतात. शिवसेना फुटीनंतर अमित गावडे, प्रमोद कुटे या नगरसेवकांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. तर मीनल यादव यांचीही भूमिका महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
लोकसभा, विधानसभेत महायुतीला मताधिक्य
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेनेचा संघर्ष अनुभवायला मिळाला. लोकसभेवेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांच्यावर मताधिक्य घेतले. विशेष म्हणजे, वाघेरे पिंपरीतील असूनही पिछाडीवर राहिले. विधानसभा निवडणुकीत पिंपरीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना झाला होता. त्यात अण्णा बनसोडे यांनी शरद पवार गटाच्या सुलक्षणा धर यांचा पराभव केला होता.
पिंपरी मतदारसंघात २०१७ मध्ये कोणाकडे किती सदस्यसंख्या
पक्ष - उमेदवार संख्या
भाजप - १३
राष्ट्रवादी - १२
शिवसेना - ३
एकूण - २८
मतदारसंघातील मतदारसंख्या
पुरुष - महिला - इतर - एकूण
२०७७७५ - १९१९९८ - ३८ - ३९९८११
Web Summary : Pimpri witnesses changing political equations. Maha Vikas Aghadi prepares to challenge BJP's stronghold. Factions within BJP and the new alliance of NCP-Shiv Sena could impact upcoming municipal elections, creating potential political shifts.
Web Summary : पिंपरी में राजनीतिक समीकरण बदल रहे हैं। महा विकास अघाड़ी भाजपा के गढ़ को चुनौती देने की तैयारी कर रही है। भाजपा के भीतर गुटबाजी और एनसीपी-शिवसेना के नए गठबंधन से आगामी नगर पालिका चुनावों पर असर पड़ सकता है, जिससे संभावित राजनीतिक बदलाव हो सकते हैं।