एफटीआयआयचे विद्यार्थी आंदोलन मागे घेणार?
By Admin | Updated: October 28, 2015 01:33 IST2015-10-28T01:33:14+5:302015-10-28T01:33:14+5:30
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने १३९ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे

एफटीआयआयचे विद्यार्थी आंदोलन मागे घेणार?
पुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांसह राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्यासमवेत झालेल्या बैठकींमधून काहीच निष्पन्न न झाल्याने १३९ दिवस सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचा विचार एफटीआयआयचे विद्यार्थी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांमध्येच काहीसे दोन गट पडले आहेत.
काही विद्यार्थी आता आंदोलनाला कंटाळले असल्याने आंदोलनाला स्वाहा: करण्याचा सूर ते आळवू लागले आहेत. लवकरच स्टुडंट असोसिएशकडून यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांतच संस्थेच्या शैक्षणिक वर्गास सुरुवात होईल, असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांनी उपोषणाचे अस्त्र उगारल्यामुळे केंद्राला आंदोलनाची दखल घेणे भाग पडले. विद्यार्थ्यांबरोबर मंत्रालय
सचिवांच्या जवळपास ३, तर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड यांच्याबरोबर एक बैठक झाली; मात्र आंदोलनावर तोडगा काढण्यापेक्षा शैक्षणिक अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांच्या अडीअडचणींवरच यामध्ये अधिकतर चर्चा
करण्यात आली. आता केंद्राने
पुन्हा ‘मौनव्रत’ धारण केले
आहे. आंदोलन पुढे सुरू ठेवायचे का नाही? केंद्राकडून आंदोलन संपुष्टात आणण्याकरिता कोणत्याच हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांची सहनशक्ती आता जवळपास संपली आहे. (प्रतिनिधी)