उजनीत आज पाणी सोडणार?
By Admin | Updated: November 23, 2015 00:52 IST2015-11-23T00:52:15+5:302015-11-23T00:52:15+5:30
उजनी धरणात चासकमान धरणाचे पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कळमोडी धरणाचे पाणी चासकमान धरणात सोडण्यात आले आहे.

उजनीत आज पाणी सोडणार?
राजगुरुनगर : उजनी धरणात चासकमान धरणाचे पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून कळमोडी धरणाचे पाणी चासकमान धरणात सोडण्यात आले आहे. उद्या म्हणजे सोमवारी पोलीस बंदोबस्तात उजनीसाठी भीमा नदीत पाणी सोडले जाईल, अशी खात्रीशीर माहिती आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने उजनीत चासकमानचे ३ टीएमसी आणि भामा-आसखेडचे ४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबर रोजी घेतला होता. त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या.
खेडचे आमदार सुरेश गोरे, बाबूराव पाचर्णे यांच्यासह काही लोकप्रतिनिधी न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने प्राधिकरणाच्या निर्णयास स्थगिती दिली नाही; पण पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली नसल्याने चासकमान धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कळमोडी या छोट्या धरणातून चासकमान धरणात पाणी सोडण्यात आले आहे.
कळमोडी धरणातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांनी थांबविण्यास भाग पाडले होते, तरी पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे.
उजनीला पाणी सोडण्यासाठी कळमोडीचे पाणी चासकमानमध्ये सोडण्यात येत आहे. चासकमानमधून उद्याच पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले जाईल, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. (वार्ताहर)