बसथांबे होणार चकाचक
By Admin | Updated: February 11, 2017 02:54 IST2017-02-11T02:54:17+5:302017-02-11T02:54:17+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे

बसथांबे होणार चकाचक
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १,७०० बसथांबे चकाचक करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. तसेच, पुढील महिन्यापासून आगारांप्रमाणेच सर्व प्रमुख बसस्थानकांवर प्रवासी दिन साजरा करणे, तिकिटावर तक्रार क्रमांक छापणे असे विविध निर्णयही प्रशासनाने घेतले आहेत.
‘पीएमपी’चा ‘बिझनेस प्लॅन’ तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम एका खासगी संस्थेकडून केले जात आहे. याअंतर्गत पीएमपी व संबंधित संस्थेकडून प्रवाशांच्या ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात आला. तसेच, आॅनलाईन सर्वेक्षण, बस प्रवासी व इतर नागरिकांशी संवाद साधून पीएमपी वाहतूक व्यवस्थेबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत पालिका आयुक्त व पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष कुणाल कुमार यांनी गुरुवारी पीएमपीतील सर्व वरिष्ठ अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बिझनेस आराखड्याचे प्राथमिक सादरीकरण करण्यात आले. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, महाव्यवस्थापक अनंत वाघमारे, मुख्य अभियंता सुनील बुरसे यांच्यासह सर्व आगारांचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित होते.
सर्वेक्षणामध्ये बस व थांब्यांची स्वच्छता याबाबत लोकांकडून अधिक नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
तसेच, ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, चालक-वाहकांची प्रवाशांशी असलेली अयोग्य वागणूक, थांब्यावर बस न थांबविणे याकडे प्रवाशांनी अधिक लक्ष वेधले आहे. याचा विचार करून संबंधित संस्थेकडून पीएमपीला तातडीने करायच्या उपाययोजना सुचविल्या आहे. याअनुषंगाने कुणाल कुमार यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत. ‘बिझनेस प्लॅनअंतर्गत सध्या विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे. अद्याप आराखडा तयार झालेला नाही. मात्र, त्यांनी तातडीच्या सुचविलेल्या उपाययोजना केल्या जात आहेत. हा आराखडा एप्रिलमध्ये मिळेल,’ असे मोरे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पीएमपीचे सुमारे १,७०० बसथांबे आहेत. त्यांपैकी अनेक थांबे अस्वच्छ असून, प्रवाशांना थांब्यावर जाणेही
कठीण होते.
काही ठिकाणी रस्त्याच्या कामाचा राडारोडा पडलेला असतो. अनधिकृत जाहिरातींमुळे अनेक बसथांबे विद्रूप झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बसथांब्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा अजेंड्यावर घेतला आहे.
निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेमार्फत थांब्याची स्वच्छता केली जाणार असून, त्यात सातत्य राखले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.