धायरी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे शुक्रवारी रात्री घडली. रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे. मूळ : वडूज, जि. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यास ताब्यात घेतले आहे. अधिक माहितीनुसार, रेश्मा यांचे पहिले लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्या दुसऱ्या पतीसमवेत नऱ्हे परिसरात राहायला आल्या होत्या. रेश्मा यांना पहिल्या पतीपासून दोन मुले होती.
शुक्रवारी सायंकाळी कुमार हा कामावरून घरी आला. त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाले. कुमार याने रागाच्या भरात ओढणीच्या साहाय्याने रेश्मा यांचा गळा दाबून खून केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. सिंहगड रस्ता ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.