पत्नीला मिळाला तिचा हक्क!
By Admin | Updated: January 26, 2017 00:06 IST2017-01-26T00:06:27+5:302017-01-26T00:06:27+5:30
पळसदेव (ता. इंदापूर) येथील उपशिक्षकाच्या पत्नीला पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील शाळा प्रशासन हलले आहे.

पत्नीला मिळाला तिचा हक्क!
लोणी देवकर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील उपशिक्षकाच्या पत्नीला पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील शाळा प्रशासन हलले आहे. पळसनाथ शिक्षक प्रसारक मंडळाने तातडीने या महिलेला सेवेत रुजू करून घेतले आहे. या महिलेला शिक्षणसेवकपदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
पतीच्या निधनानंतर शिक्षण विभागाकडून आदेश येऊनही अनुकंपा तत्त्वावर सुदर्शना पवार यांना सेवेत घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे पवार यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. सुदर्शना पवार यांचे पती पळसनाथ विद्यालयात उपशिक्षक या पदावर सेवेत होते; परंतु त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे लहान दोन मुलगे, पत्नी व आई-वडील आहेत. पतीच्या निधनानंतर कोणताही आधार नसल्याने पवार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. अनुकंपा तत्त्वावर सुदर्शना पवार यांची नियुक्ती करण्याबाबतची पत्रे पुणे येथील शिक्षणाधिकरी व शिक्षण उपसंचालक यांनी पळसनाथ विद्यालयास देऊनही कामावर रुजू करून घेतले नव्हते. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ हलले आहे.
संस्थेने तातडीने सुदर्शना पवार यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
तसेच, १५ जून २०१७ पासून
अनुकंपा तत्त्वावर कायमस्वरूपी शिक्षणसेवकपदावर नियुक्ती केल्याचे पत्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दिले. नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेतले.