‘हवाईजादा’कडून जिद्दीची शिकवण
By Admin | Updated: January 22, 2015 00:50 IST2015-01-22T00:50:26+5:302015-01-22T00:50:26+5:30
शिवकुमार तळपदे यांची भूमिका साकारताना आयुष्यात जिद्दीची शिकवण मिळाल्याचे प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराणा यांनी सांगितले.

‘हवाईजादा’कडून जिद्दीची शिकवण
पुणे : सर्व बाजूंनी विरोध होत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या शिवकुमार तळपदे यांची भूमिका साकारताना आयुष्यात जिद्दीची शिकवण मिळाल्याचे प्रसिद्ध अभिनेता आयुष्यमान खुराणा यांनी सांगितले.
शास्त्रज्ञ शिवकुमार बापूजी तळपदे यांनी मुंबई येथे १८९५ मध्ये पहिले मनुष्यविरहित विमान तयार केले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘हवाईजादा’ या चित्रपटात आयुष्यमान एका हटके भूमिकेमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष्यमानने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन या चित्रपटाविषयी मनमोकळा संवाद साधला. या प्रसंगी मावेन ग्रुप व आगम रिअॅलिटरचे संचालक कल्पेश जैन यांनी आयुष्यमान खुराणा यांचे स्वागत केले.
‘विकी डोनर’, नौटंकी साला’ आणि ‘बेवकूफियॉं’ या चित्रपटांच्या माध्यमातून आपली अभिनयाची चुणूक दाखविलेल्या आयुष्यमानने ‘पानी दा रंग देखके’ किंवा ‘साडी गली आ जा’, ‘तू ही तू’ या गाण्यांद्वारे आपल्या प्रतिभावान गायकीचे दर्शनही घडविले आहे. याबद्दल सांगताना तो म्हणाला, ‘‘लहानपणापासून रंगभूमीवर काम करीत आलो. त्यातूनच अभिनय आणि संगीत या दोन्हींचा सराव झाला. अनेक गाणी स्वत: रचली. या दोन्हींची समान पॅशन असली तरी अभिनयापेक्षा संगीत जास्त अवघड आहे.’’
आजवर व्यावसायिक चित्रपटांपेक्षा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड केलेला आयुष्यमान ‘हवाईजादा’द्वारे एका गंभीर भूमिकेत प्रथमच दिसणार आहे. त्याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘‘जगातील पहिले विमान एका भारतीय शास्त्रज्ञाने तयार केले, ही सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ती भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हान होते. ४५ वर्षांच्या तळपदेंचे रेखाचित्र उपलब्ध होते. त्यातून ३० वर्षांच्या तळपदेंचे व्यक्तिमत्त्व उभे केले. साहिल कोचर यांनी वेशभूषेवर खूप मेहनत घेतली.
जवळपास ७ ते ८ महिने दिसण्याच्या चाचण्या झाल्यानंतर ‘ओके’ म्हणून हिरवा कंदील मिळाला. त्या वेळची मुंबई खूप वेगळी होती. हिंदी, उर्दू आणि मराठी भाषांचे मिश्रण होते. सौरभ भावे यांनी माझी मराठीची कार्यशाळा घेतली.
या चित्रपटात ‘दिले नादाँ’ ही मिर्झा गालिब यांची गझल गायली असल्याचे सांगून या चित्रपटामध्ये खूप क्षमता असल्याने माझ्या चित्रपट कारकिर्दीतील हा ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल. (प्रतिनिधी)
४‘विकी डोनर’ पासून ‘नोटंकी साला’, ‘बेवफुकीयॉ’ या सारख्या चित्रपटातून तरुणाईला भुरळ घालणाऱ्या आयुष्यमान खुराणाच्या भेटीने इंदिरा इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी दंग होऊन गेले. आयुष्यमानने या वेळी आपला जीवनप्रवास उलगडला. तो म्हणाला, ‘‘स्टारडम ही देवाची देणगी आहे, मला त्याची कोणतीही घमेंड नाही. शिवकुमार तळपदे यांच्या आयुष्यावरील ‘हवाईजादा’ तरुणाईला निश्चितच प्रेरणा द्यावी.’’ चाणक्य एज्युकेशन सोसायटीचे इंदीरा इन्स्टीट्यूटच्या वतीने चेतन वालकलकर यांनी त्यांचा सत्कार केला.
४आयुषमान म्हणाला, ‘‘अभिनय आणि संगीत या दोन्ही गोष्टींची ‘पॅशन’ आहे. पण संगीताला मर्यादा आहेत. सात सूरांच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. मात्र अभिनयाचे तसे नसल्याने संगीतापेक्षा अभिनय अधिक सोपा वाटतो.’’
४‘एका प्रसंगात उंचीवर पॅराग्लायडिंगवरून खाली यायचे होते. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांना हे शक्य झाले नसते. या प्रसंगाचे केवळ २५ रिटेक झाले असल्याची आठवही आयुष्यमानने सांगितली.