भव्यदिव्यतेचा घाट कशाला?
By Admin | Updated: February 7, 2017 03:12 IST2017-02-07T03:12:29+5:302017-02-07T03:12:29+5:30
डोंबिवलीच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे रसिकांना आकर्षून घेण्यासाठी आयोजकांनी कोटीच्या कोटी उड्डाणाकडे नेणाऱ्या भव्यदिव्यतेकडे अधिक लक्ष पुरविले.

भव्यदिव्यतेचा घाट कशाला?
पुणे : डोंबिवलीच्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे रसिकांना आकर्षून घेण्यासाठी आयोजकांनी कोटीच्या कोटी उड्डाणाकडे नेणाऱ्या भव्यदिव्यतेकडे अधिक लक्ष पुरविले. तरीही या नेत्रदीपक ‘साहित्यपंढरी’कडे वारकऱ्यांनी पाठच फिरविल्याचे दिसून आले. राजकीय हेव्यादाव्यांमुळे रुसवेफुगवे काढण्यात व्यस्त असलेल्या आयोजकांना दोनदा निमंत्रणपत्रिका छापण्याची वेळ आली.
या गदारोळात पत्रिकांचे वितरणच योग्य प्रकारे न झाल्यामुळे अनेक साहित्यिक संमेलनापासून वंचित राहिले. खूप वर्षांनी आगरी यूथ फोरमला हा मान मिळतो आहे, तेव्हा आयोजनात कोणतीच कसर उरता कामा नये. या उत्साहाच्या भरातच साहित्याचे पाईक असलेल्या साहित्यिक मंडळींनाच निमंत्रण देण्याची सवड आयोजकांना मिळाली नाही. मग हा संमेलनाचा बडेजाव का आणि कुणासाठी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मराठी साहित्यासंदर्भात चर्चेच्या माध्यमातून विचारमंथन घडण्याबरोबरच साहित्याच्या विविध अंगांना परिसस्पर्श करीत भाषेला दिशा देण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाला साहित्यप्रवाहात सामावून घेण्यासाठी गेल्या ९० वर्षांपासून ही साहित्य संमेलनाची पताका फडकविली जात आहे. साहित्यिक आणि रसिक यांच्यात संवादाचा सेतू निर्माण करणे हे संमेलनाचे मुख्य प्रयोजन. पण या दोघांच्या उपस्थितीशिवाय जर संमेलनाचा झेंडा मिरविला जाणार असेल तर संमेलनाच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभे राहण्यासारखे आहे. आज संमेलन पुण्या-मुंबईपुरतेच राहिले असल्याने तो एखाद्या इव्हेंट स्वरूपात साजरा होत असल्यामुळे संमेलनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
या भव्यदिव्यतेच्या मागे खर्चाचे आकडे धावू लागले आहेत, या नादात जे साहित्याचे खरे सेवेकरी आहेत, अशा लेखक-साहित्यिकांनाच संमेलनापासून वंचित ठेवले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे, यंदाचे संमेलनही त्याला अपवाद ठरलेले नाही.
राजकीय रुसव्या-फुगव्यांमुळे आयोजकांना संमेलनाच्या पत्रिका दोनदा छापाव्या लागल्या, आयोजकांना या निमंत्रणपत्रिकांचे वाटप करणेही शक्य झाले नाही. याच्या परिणामस्वरूप अनेक चांगली साहित्यिक-लेखक मंडळी संंमेलनापासून दूर राहिली. नेहमीप्रमाणे संमेलनात साहित्यिकांपेक्षा निमंत्रित लेखक-कवी यांचीच ‘भाऊगर्दी’ अधिक दिसली. संमेलनाला उत्सवी स्वरूप आले आहे, असे म्हटले तरी सर्वांना संमेलनात सामावून घेणे अपेक्षित असते, मात्र तसे झाले नसल्याची खंत साहित्यिकांनी व्यक्त केली.