माझ्या घरात का राहते म्हणून सुनेवर सुरीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:15+5:302021-06-18T04:08:15+5:30

चाकण : माझ्या घरात कशी राहते, असे म्हणत चिडलेल्या ७५ वर्षीय सासऱ्याने ३५ वर्षीय सुनेवर लांब पात्याच्या लोखंडी सुरीने ...

Why does he stay in my house? | माझ्या घरात का राहते म्हणून सुनेवर सुरीने हल्ला

माझ्या घरात का राहते म्हणून सुनेवर सुरीने हल्ला

चाकण : माझ्या घरात कशी राहते, असे म्हणत चिडलेल्या ७५ वर्षीय सासऱ्याने ३५ वर्षीय सुनेवर लांब पात्याच्या लोखंडी सुरीने सपासप वार केल्याचा प्रकार संतोषनगर (भाम, ता. खेड) येथे बुधवारी घडला. सुनेवर हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून गेलेला सासरा पुणे-नाशिक महामार्गावर चाकणमध्ये रस्त्यालगत बेशुद्धावस्थेत सापडला. सासरा आणि सून या दोघांवरही चाकणमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांना घटनास्थळी लाकडी मुठीची लांब पात्याची सुरी मिळून आली आहे.

राधिका मोरेश्वर येवले (वय ३५ वर्षे, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी सासरा पुरुषोत्तम दगडू येवले (वय ७५) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका आणि पुरुषोत्तम यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. राधिका हिला घरात राहूच द्यायचे नाही, या कारणावरून तिला पुरुषोत्तम हे त्रास देत होते. बुधवारी सकाळी राधिका ही घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचा पाठलाग करत गेलेल्या सासऱ्याने मानेवर, हातावर, गालावर, पायावर लोखंडी सुरीने गंभीर वार केले. या हल्ल्यात राधिका ही गंभीर जखमी झाली. सासऱ्याच्या तावडीतून सुटून राधिका टेरेसवरून खाली धावत आल्या. त्याच्या पाठोपाठ सासरेदेखील धावत आले. त्यानंतर सासरे पुरुषोत्तम दुचाकीवरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी असलेल्या राधिका यांना तातडीने रुग्णवाहिकेतून चाकण येथे पाठवले. मात्र, पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्यात सासरे पुरुषोत्तमदेखील बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. सासरा आणि सून या दोघांनाही चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Why does he stay in my house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.