वीजचोरी रोखणार कोण?
By Admin | Updated: November 6, 2014 00:29 IST2014-11-06T00:29:07+5:302014-11-06T00:29:07+5:30
मीटरमध्ये फेरफार करून वेगवेगळ्या पद्धतीने जोड घेत मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात आहे.

वीजचोरी रोखणार कोण?
मिलिंद कांबळे, पिंपरी
मीटरमध्ये फेरफार करून वेगवेगळ्या पद्धतीने जोड घेत मोठ्या प्रमाणात वीजचोरी केली जात आहे. विद्युतरोहित्र बॉक्समधून (डीपी) आणि थेट उघड्या तारेवर आकडा टाकून वीज घेतली जाते. घरगुती, व्यापारी, औद्योगिक आणि शेती या वर्गातील ग्राहक निरनिराळ्या तंत्रांचा अवलंब करीत सर्रास वीजचोरी करतात. या वाढत्या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या (महावितरण) पिंपरी आणि भोसरी विभागाच्या एकूण उत्पन्नापैकी दर महिन्यास प्रत्येकी साडेचौदा
टक्के नुकसान होत आहे. ही तूट भरून काढण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
मीटर बिलाची रक्कम वाचविण्यासाठी वीजचोरीचा प्रकार केला जातो. घरगुती व व्यापारी (कर्मशिअल) ग्राहक असलेले नागरिक मीटरमधून बायपास जोड घेतात. दुसऱ्या मीटरमधून छुप्या तऱ्हेने पुरवठा वळवितात. मीटर रीडिंग कमी होण्यासाठी त्यात फेरफार करतात. मीटरचा वेग नियंत्रित करतात. तसेच, डीपी बॉक्समधून किंवा केबलला थेट वायर जोडून वीज घेतात. काही ठिकाणी उघड्या तारांवर आकडा टाकून घरात वीज घेतली जाते. या पद्धतीने झोपडपट्टी, नागरी वसाहत, चाळ या भागांत ग्राहक सर्वाधिक वीज चोरी करीत असल्याचे महावितरणला दिसून आले आहे. याचपद्धतीने वीजचोरी आणि रीडिंग कमी
करण्यात दुकानदार, व्यापारी, लघुउद्योग, कार्यालय, संस्थाही आढळून आले आहेत.
सुरक्षित समजल्या जाणाऱ्या हौसिंग सोसायट्यामधूनही वीज चोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तेथे रिमोट कंट्रोलद्वारे मीटर नियंत्रित करून मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. त्यामुळे रीडिंग कमी दाखविले जाते. येथे मीटरमध्ये फेरफारचा प्रकारही केला जातो.
शेती आणि ग्रामीण भागात थेट आकडे टाकून वीज घेतली जाते. वीज पंपाद्वारे विहीर, बोअर, नदी येथून पाणी खेचण्यासाठी या विजेचा वापर होतो. श्रीमंत शेतकरीही या मार्गाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. मीटर बसलेल्या ठिकाणी बोअरिंगला पाणी बंद झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बोअर घेतला जातो. तेथे आकडा टाकून वीज घेण्याचे प्रकार घडतात.
या सर्वच पद्धतीने होणाऱ्या वीज चोरीमुळे पिंपरी आणि भोसरी विभागीय कार्यालयाचे दर महिन्यास प्रत्येकी साडेचौदा टक्के नुकसान होत आहे. एकूण पुरवठा केलेल्या विजेपैकी ८५ ते ८६ टक्के विजेच्या मोबदल्यात रक्कम वसूल होते.