धोकादायक वाहतूक रोखणार कोण?
By Admin | Updated: December 20, 2014 00:13 IST2014-12-20T00:13:13+5:302014-12-20T00:13:13+5:30
शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र

धोकादायक वाहतूक रोखणार कोण?
चिंचवड : शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यांची अंमलबजावणी मात्र सर्वसामान्य वाहनचालकांसाठीच होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने ही धोकादायक वाहतूक रोखणार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
शहरातील चौकांत वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येते. हेल्मेट, वाहन परवाना, कागदपत्रे, पीयूसी आदी गोष्टींची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसांसह खाकी वदीर्तील पोलीसही व्यस्त असतात. मात्र क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, हे समजत नाही.
शहरातील विविध रस्त्यांवर ट्रक, टेम्पो, कंटेनर, ट्रेलर व तीनचाकी रिक्षांमधून विविध प्रकारचे बांधकाम साहित्य, भंगार मालासह अवजड मालाची वाहतूक सर्रास सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करीत आहेत. अशा धोकादायक वाहनांमुळे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र वाहतूक शाखा अशा वाहनांवर कडक कारवाई करीत असल्याचे दिसत नाही.
अशा धोकादायक वाहनांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. मुंबई-पुणे महामार्गावरही अशा वाहनांची खुलेआम वाहतूक सुरू असते. वाहतूक शाखेचे कर्मचारी अशा वाहनांना अडवून काय कारवाई करतात, हेच समजत नाही. आर्थिक हितसंबंधांमुळेच धोकादायक वाहतुकीला पाठबळ मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती चौक, मुख्य बसथांबा, आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन परिसर, चिंचवड-भोसरी रोड, चिखली-तळवडे रोड, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी रोड, पिंपरी लिंक रोड, काळेवाडी, थेरगाव या भागात धोकादायक वाहतूक सुरू आहे. काही व्यावसायिक वाहने नियमित अशी वाहतूक करीत आहेत. परंतु वाहतूक शाखेशी या व्यावसायिकांचे लागेबांधे असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही प्रश्न गंभीर आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात अशा वाहनांचे धोकादायक चित्र सहज दिसते. मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा धोकादायक वाहतुकीस मोठा अपघात होण्यापूर्वीच आवर घालणे महत्त्वाचे आहे.
शहरातील वाहतूक नियोजनाबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे शहरातील आमदारांनी जाहीर केले आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी योग्य नियोजन व्हावे, आर्थिक हितसंबंध व कोणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)