चासकमानच्या पाण्याला आहे का कुणी वाली?
By Admin | Updated: January 14, 2017 03:16 IST2017-01-14T03:16:21+5:302017-01-14T03:16:21+5:30
चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे

चासकमानच्या पाण्याला आहे का कुणी वाली?
दावडी/चासकमान : चासकमान धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्सने ५० दिवसांसाठी पाण्याचे आर्वतन कालपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहते की नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चासकमान धरणाला कोणी वाली आहे का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याची गरज नसतानासुद्धा २७ दिवसांतच पाण्याचे दुसरे आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे. हे सोडलेले पाण्याचे आवर्तन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
खेड व शिरूर तालुक्याला चासकमान धरण वरदान ठरले आहे. रब्बी हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या कालव्यास पाण्याचे दुसरे आवर्तन कालपासून सोडण्यात आले आहे. मागील रब्बी हंगामासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन ४० दिवसांचे होते, ते (डिसेंबर २०१६) मधील १८ तारखेला बंद करण्यात आले होते. तिन्हेवाडी, बुट्टेवाडी, भांबुरवाडी, टाकळकरवाडी, खरपुडी, रेटवडी, दावडी, निमगाव तसेच शिरूर तालुक्यांतील गावांना पाण्याची गरज नसताना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाण्याचे आवर्तन पन्नास दिवसांचे आहे. टेल टू हेड या पद्धतीने या पाण्याचे वाटप होणार आहे. शिरूरसाठी २७ दिवस व खेडसाठी २३ दिवस या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे.
शेतकऱ्यांची पाणी सोडावी अशी कुठलीही मागणी नसताना डाव्या कालव्यातून पन्नास दिवस पाणी सुरू राहिल्यास पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होणार आहे. धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची गरज नसताना अशीच नासाडी सुरू राहिल्यास ऐन उन्हाळयात धरणात पाणी शिल्लक राहील का, असा प्रश्न शेतकरी विचारु लागला आहे. पन्नास दिवसांचे सोडलेले पाण्याचे आर्वतन कमी दिवसांचे करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. सध्या या परिसरात विहिरीची पाण्याची पातळी टिकून आहे. खरपुडी, वाटेकरवाडी, निमगाव, शेलपिंपळगाव येथील बंधाऱ्यांत मुबलक प्रमाणात पाणी आहे. सध्या या परिसरात कांदा, व बटाटा, ज्वारी ही पिके काढणीस आली आहे. त्यामुळे या पिकांना पाण्याची गरज नसल्याचे शेतकरी सांगत आहे.