वाहतूककोंडीस जबाबदार कोण?

By Admin | Updated: January 14, 2017 02:43 IST2017-01-14T02:43:10+5:302017-01-14T02:43:10+5:30

शहरातील वाहतूककोंडीच्या समस्या गेल्या काही वर्षांत जटिल झाली असून, यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही.

Who is responsible for the transporters? | वाहतूककोंडीस जबाबदार कोण?

वाहतूककोंडीस जबाबदार कोण?

कामशेत : शहरातील वाहतूककोंडीच्या समस्या गेल्या काही वर्षांत जटिल झाली असून, यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे या कोंडीचा त्रास वाहनचालक, पादचारी, सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक आदींना होत आहे. या वाहतूककोंडीला नक्की जबाबदार कोण, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत.
कामशेत ही मावळातील मध्यवर्ती बाजारपेठ असून नाणे, पवन, अंदर मावळासह आजूबाजूच्या सुमारे ७० गावांचे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. शहराजवळूनच जुना मुंबई-पुणे महामार्ग व लोहमार्ग असल्याने रोज हजारोच्या संख्येने नागरिक शहरात विविध कामांसाठी येत असतात. शहरात पूर्वीपासून मोठी बाजारपेठ असून अनेक शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, अनेक खासगी दवाखाने, बँका, पोस्ट आॅफिस, रेल्वे स्टेशन व इतर अनेक महत्त्वाची ठिकाणे असल्याने विद्यार्थी, नोकरदारवर्ग, शेतकरी, व्यावसायिक आदींची शहरात मोठी वर्दळ असते.
रस्त्यावर तासन्तास उभी राहणारी वाहने, बेशिस्त वाहनचालक, व्यापाऱ्यांची वेळी-अवेळी येणारी मालवाहतूक वाहने, हातगाडीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाले, बेशिस्त पथचालक, वाहन पार्किंग सुविधेचा अभाव व इतर अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहतूक पोलिसांच्या सततच्या कारवाईनेहीही कोंडी सुटत नसून, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व नागरिकांच्या उदासीनतेमुळे वाहतूककोंडीची समस्या अवघड झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईत गरिबांच्या टपऱ्या हटवून श्रीमंतांच्या अतिक्रमणांकडे काणाडोळा केल्याचा आरोप अनेकजण करत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढली आहेत. मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्या दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक दुकानदारांचा माल रस्त्यावर येत असून, पादचारी, तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुचाकी वाहने उभी करण्यासाठी थोडीही जागा शिल्लक राहत नसल्याने अनेक वाहने रस्त्यावरच लावली जातात. शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे झाल्यानंतर पार्किंगला शिस्त लावण्यासाठी व वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आली. पण, वाहने लावण्यासाठी साइडपट्ट्याच शिल्लक नसल्याने या योजनेचा उपयोग झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उभारला. वरिष्ठ पोलीस अधिकारी आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार डी. बी. खंडागळे व तीन वॉर्डन यांनी मागील एका डिसेंबर महिन्यातच ४२७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. यातून ६७,८०० रुपये दंड वसूल केला आहे. यात १३ जणांवर ड्रंक इन ड्राइव्हचे गुन्हे दाखल केले आहेत. १३ अवैध प्रवासी वाहतूक, १६९ लेनकटिंग, १०८ विनाहेल्मेट, ६ सीटबेल्ट, ३६ वाहन कागदपत्रे नसणे, ६३ ट्रिपलसीट, २ नो पार्किंग, ५ मालवाहतूक, २ विना वाहन परवाना, ९ अल्पवयीन चालक, २ रॉँग साइड, २ मोबाइलवर बोलणे, १० इतर आदी आहेत. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असूनही वाहतूककोंडीची समस्या सुटत नाही. ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य रस्त्याच्या साइडपट्ट्या खुल्या करीत नाहीत, तोपर्यंत ही कोंडीची समस्या सोडवणे कठीण असल्याचे पोलीस अधिकारी व वाहतूक पोलिसांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Who is responsible for the transporters?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.