काळदरी आरोग्य केंद्राला कोणी जागा देता का जागा?

By Admin | Updated: May 10, 2017 03:55 IST2017-05-10T03:55:12+5:302017-05-10T03:55:12+5:30

पुरंदर तालुक्यातील काळदरी (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आहे.

Who has given space to the Kalidari Health Center? | काळदरी आरोग्य केंद्राला कोणी जागा देता का जागा?

काळदरी आरोग्य केंद्राला कोणी जागा देता का जागा?

लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : पुरंदर तालुक्यातील काळदरी (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील ४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना सुमारे ३५ ते ४५ कि.मी. दूर जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम जागेअभावी रखडले असून, या प्रश्नाकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
काळदरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता आहे. येथे प्र्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे या मागणीसाठी डोंगरी भागातील जनतेने शासनाकडे वारंवार निवेदन दिले. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. त्यानंतर जनप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने शासनाने १७/१/२०१३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता दिली. त्यामुळे परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लोटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकांत आरोग्य केंद्र कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून २ एकर समतल जागेची मागणी होत असून, डोंगर भागात सलग व सपाट २ एकर जागा उपलब्ध होणे अशक्य आहे. सद्यस्थितीला ग्रामपंचायत स्वमालकीची गावठाणाची समतल २० गुंठे जागा असून, सध्याच्या आरोग्य उपकेंद्रालगतच १४ गुंठे जागा उपलब्ध आहे. पुरंदरच्या दुर्गम डोंगरी भागातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, जागा उपलब्धतेच्या दृष्टीने तीन मजली इमारतीचा आराखडा बनवावा व त्यास तांत्रिक मान्यता घ्यावी, अशी मागणी काळदरीचे सरपंच अंकुश परखंडे यांनी केली आहे.
काळदरी खोऱ्यात बहिरवाडी, घेरापुरंदर येथे अपुऱ्या सोयी, कुपोषणासह आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. दुर्गम भाग असल्याने व्यापक जनहित लक्षात घेता या आरोग्य केंद्राचे बांधकाम होऊन रुग्णांना सेवा देणे अत्यावश्यक बनलेले आहे. दरवर्षी या डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात. एखाद्याला सर्पदंश झाला की सासवडला अथवा भोरला जावे लागते. दरम्यान दोन्ही ठिकाण जास्त अंतरावर असल्याने आजअखेर सर्पदंशाने काळदरी येथील ओम ज्ञानेश्वर राऊत, स्नेहल प्रकाश यादव तसेच बहिरवाडी येथील योगेश संजय ढगारे यांना तातडीच्या उपचाराअभावी प्राण गमवावे लागले तर रेखा भंडलकर व पांडुरंग चव्हाण यांना तालुक्याच्या ठिकाणी उपचार मिळाल्याने सुदैवाने प्राण वाचले.
या भागातीलच आप्पा दशरथ वाघमारे यांना बेदम मारहाण झाल्यावर उपचार वेळेत न मिळाल्याने ते गतप्राण झाले. परिसरातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात शिरवळ, किकवी, माहूर, परिंचे, सासवड आदी ठिकाणी उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र आहे. यावर अजून किती हकनाक बळी गेल्यावर तोडगा निघतो? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

Web Title: Who has given space to the Kalidari Health Center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.