‘व्हेजिटेबल ट्रान्स प्लान्टनर’
By Admin | Updated: July 7, 2015 05:13 IST2015-07-07T05:13:17+5:302015-07-07T05:13:17+5:30
बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतर पीक व मुख्य पीक पेरणी व लागवडीसाठी आधुनिक उपकरण विकसित केले आहे.

‘व्हेजिटेबल ट्रान्स प्लान्टनर’
विनोद पवार, मोरगाव
बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंतर पीक व मुख्य पीक पेरणी व लागवडीसाठी आधुनिक उपकरण विकसित केले आहे. यामुळे लाखांची किंमत आता माफक झाली आहे. कमी खर्चात या यंत्राची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. परदेशी यंत्राच्या तुलनेत हे केवळ काही हजारांच्या किमतीमध्ये तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मजूर टंचाईवर आता सक्षम पर्याय मिळाला आहे. बीजपेरणीसह, रोपांची आंतरपिकांची लागवड अधिक जलद गतीने होणार आहे. तर उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये पेरणीसह पालेभाज्या लागवडीचे संयुक्त ‘व्हेजिटेबल ट्रान्स प्लान्टनर’ नावाने हे मॉडेल विकसित केले आहे. जर्मनी, इटली या देशांनी निर्मिती केलेली अवजारे सध्या मोठ्या शेतकऱ्यांच्या सोईसाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात भाडेतत्त्वावर दिली जातात. मात्र, याची किंमत ८ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे ते विकत घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही. याबाबतचा विचार करून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे आधुनिक उपकरण विकसित केले आहे. याद्वारे ऊस, कांदा, बटाटा, पालेभाज्या त्याचबरोबर बियाणांची ही पेरणी एकाच वेळेस करता येते. तीन फुट उंच व चार फुट लांब हे मशीन आहे. हे उपकरण हाताद्वारे अथवा ट्रॅक्टरद्वारे सहज चालवणे शक्य आहे. सध्या या उपकरणाच्या निर्मितीसाठी अंदाजे ३० ते ४० हजार रुपये खर्च येणे अपेक्षित असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. या निर्मितीत परदेशी उपकरणाच्या तुलनेत लागवड व पेरणी पद्धतीचा बदल सहजगत्या करण्याच्या दृष्टीने पर्याय निर्माण केलेले आहेत. यातील सुधारित संशोधन झाल्यास नव्याने काही बदल सहज व सुलभ आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे उपकरण अधिक फायद्याचे आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी कॉलेजचे विद्यार्थी महेश गायकवाड, नीलम कारंडे, प्रशांती ढवाण, तेजस्वी मोझे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर संस्थेचे प्रा. एस. व्ही शेळके, एच. पी. बोराटे यांनी मार्गदर्शन केले.