राहूबेटात बिबट्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: February 9, 2017 03:14 IST2017-02-09T03:14:32+5:302017-02-09T03:14:32+5:30
राहूबेट (ता. दौंड) परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असून, बिबट्याने अनेक शेळ्या-मेंढ्या, जनावरांचा फडशा पाडत जणू धुमाकूळच घातला आहे

राहूबेटात बिबट्याचा धुमाकूळ
पाटेठाण : राहूबेट (ता. दौंड) परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असून, बिबट्याने अनेक शेळ्या-मेंढ्या, जनावरांचा फडशा पाडत जणू धुमाकूळच घातला आहे. बुधवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास पाटेठाण (ता. दौंड) येथील सागर देविदास हंबीर यांच्या लोकवस्तीमध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला चढवून एका रात्रीत ६ मेंढ्यांचा फडशा पाडल्याची भीतिदायक तसेच टेळेवाडी (ता. दौंड) येथील दिलीप टेळे यांच्या गोठ्यातील एक कालवड जागीच ठार मारल्याची घटना घडली. या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
वर्षभरापासून राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढले असून, त्याने आत्तापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक शेळ्या, मेंढ्या, कालवडी यांचा फडशा पाडला आहे. सात दिवसांपूर्वीच राहू येथील भाऊसाहेब सोनवणे यांची एक मेंढी बिबट्याने ठार मारली होती. देवकरवाडीनजीक गणेशनगर येथेदेखील ५ ते ६ जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला होता. त्यानंतर येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतरदेखील परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असल्याने आणखी किती बिबटे, वन्यप्राणी परिसरात आहेत, याचा वन विभागालादेखील नेमका अंदाज आलेला नाही.
बुधवारी पहाटेच्या सुमारास सागर देविदास हंबीर यांच्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढवून एकाच वेळी सहा मेंढ्या जागीच ठार मारल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, घटनेचा पंचनामा यवत वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी सरवर खान, वनरक्षक सुलतान शेख, कर्मचारी विलास होले, सुरेश पवार, बाळू आडसूळ, कोकरे यांच्या पथकाने केला आहे.