प्रभाग सदस्यपदी संधी कोणत्या गटाला?
By Admin | Updated: June 18, 2015 23:42 IST2015-06-18T23:42:49+5:302015-06-18T23:42:49+5:30
महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज मागवण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातून तिघांची निवड होणार आहे.

प्रभाग सदस्यपदी संधी कोणत्या गटाला?
भोसरी : महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज मागवण्यात आले असून, प्रत्येक प्रभागातून तिघांची निवड होणार आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने सर्वच प्रभागांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरात एकही उमेदवार निवडून आला नाही. एकीकडे पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीमुळे भोसरीत झालेली पक्षाची वाताहत, तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपाची धरलेली वाट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांची मोठी कसरत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग सदस्यपदाच्या माध्यमातून निष्ठावंतांना संधी देऊन भोसरी मतदारसंघात पक्षात झालेली मरगळ दूर करणार, की २०१७ची महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लांडगे गटाला सदस्यपदासाठी संधी मिळणार, याबद्दल भोसरीत मोठी उत्सुकता आहे.
लांडगे यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आहेत. त्यांची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. मात्र, आमदार लांडगे हे अपक्ष निवडून आल्याने त्यांनी सत्ताधारी भाजपालाही जवळ केले असल्याचे चित्र सध्या तरी भोसरीत दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आल्यावर लांडगे यांच्या कार्यालयास भेट दिली होती. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. लांडगे यांनी निवडून आल्यानंतर अनेक कामांचा धडाका लावला आहे, तर माजी आमदार विलास लांडे यांनी शांत राहत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार लांडे हे काहीच भूमिका घेत नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षण मंडळ सभापतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या गटाला हे पद मिळवून देत आपण अजूनही राष्ट्रवादीतच सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीतीलच एका गटबाजीमुळे आपला पराभव झाला असल्याची खंत लांडे यांना आहे. त्यामुळे ते पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज आहेत.
लांडे गटातील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सदस्यपदासाठी अर्ज केले आहेत. तसेच, लांडगे यांच्या गटातीलही अनेकांनी आपला अर्ज दाखल केला असल्याने कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढू लागली आहे.
भोसरी मतदारसंघात दोन्ही प्रभागांत सहा सदस्यांसाठी इ प्रभागासाठी २१, तर फ प्रभागासाठी ३५ इच्छुकांनी आपले अर्ज महापालिकेतील गटनेत्या मंगला कदम यांच्याकडे दाखल केले आहेत. कोणत्याही गटाकडून कोणीही अर्ज दाखल केले असले, तरी कोणाची निवड होणार, हे अजित पवारच ठरवणार, हे निश्चित आहे. (वार्ताहर)
-भोसरी मतदारसंघात महापालिकेचे दोन क्षेत्रीय प्रभाग आहेत. या दोन्ही प्रभागांत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. या दोन प्रभागांत प्रत्येकी तीन असे एकूण सहा सदस्य निवडून देण्यात येणार आहेत.
-गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय मोट बांधत बंडखोरी करून नगरसेवक महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला. अपक्ष निवडून आल्यानंतरही पिंपरी मतदारसंघातील महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत लांडगे राष्ट्रवादीचा प्रचार करत होते.