...तेव्हा प्रेक्षक कुठे असतो?
By Admin | Updated: January 25, 2017 02:15 IST2017-01-25T02:15:33+5:302017-01-25T02:15:33+5:30
मराठी प्रेक्षक हा नाट्यवेडा आहे असे सांगितले जाते. मात्र जेव्हा नाट्यसंस्कृतीवर सेन्सॉर बोर्ड किंवा तत्सम संस्कृतिरक्षक प्रवृत्तींकडून

...तेव्हा प्रेक्षक कुठे असतो?
पुणे : मराठी प्रेक्षक हा नाट्यवेडा आहे असे सांगितले जाते. मात्र जेव्हा नाट्यसंस्कृतीवर सेन्सॉर बोर्ड किंवा तत्सम संस्कृतिरक्षक प्रवृत्तींकडून हल्ला होतो, राम गणेश गडकरींचा अपमान केला जातो तेव्हा त्याच्या विरोधात केवळ दहा ते वीस कलाकारच रस्त्यावर येतात, ही लढाई काय एकट्या कलाकारांची आहे का? अशा वेळी ना्यवेडा माणूस कुठे जातो? जो लढायला उभा आहे त्याच्यामागे एक प्रेक्षक म्हणून उभे राहाणार नसाल तर मराठी माणसाला नाट््यवेडा हे बिरुद लावायचे का ? अशा परखड शब्दातं ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी ‘नाट्यवेड्या’ रसिकांना खडे बोल सुनावले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या रंगभूमीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालेकर यांच्या हस्ते त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अभिनेत्री वंदना गुप्ते, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा देशपांडे, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पदाधिकारी सत्यशील धांडेकर, समीर हंपी व दीपक गुप्ते उपस्थित होते.
‘सखाराम बार्इंडर’च्या वादग्रस्त अध्यायाचा आजच्या काळाशी धागा पकडत पालेकर म्हणाले, या नाटकातील चंपा (लालन सारंग) आणि सखाराम (निळू फुले) यांनी रंगभूमीवर अनेक अर्थाने वस्तुपाठ घालून दिला. तो जतन करून ठेवला पाहिजे, मात्र सुदैवाने असे होताना दिसत नाही. नाटकाचा हा इतिहास केवळ रंगभूमीपुरता मर्यादित न राहता तो सांस्कृतिक इतिहास म्हणून जतन केला जायला हवा, तसे झाले नाही तर तो इतिहास काळाच्या ओघात विरून जाईल आणि त्यातून हे मान्य नाही मग पुतळे तोडा-फोडा असे नको ते गुंडगिरीचे धाडस निर्माण होईल, जे आज झाले आहे. हा ठेवा जतन केला तर त्यांना हा आपल्या अस्मितेचा भाग आहे याचे भान येईल.
या वेळी मराठी प्रेक्षकांवरही पालेकर यांनी शरसंधान साधले, नाट्यसंस्कृतीवर हल्ला केला जातो तेव्हा त्याचा निषेध हा चार ते पाच कलाकार इतक्यापुरताच मर्यादित असतो, अशा वेळी हा ‘नाट्यवेडा’ बिरुद लावलेला मराठी प्रेक्षक कुठे जातो? राम गणेश गडकरी यांचा अपमान सहन होत असेल तर सांस्कृतिक वेडा प्रेक्षक असे म्हणायचे का? ज्या वेळी मराठी प्रेक्षक कलाकारांच्या पाठीशी उभे राहातील तर तीच लालन सारंग यांना मानवंदना ठरेल.
वंदना गुप्ते म्हणाल्या, कुठल्याही परिस्थितीला सामोरी जाणारी लालन सारंग ही रंगभूमीवरची झाशीची राणी आहे. त्यांच्याकडून आत्मविश्वास, निडरपणा, बेडरपणा घेण्यासारखा आहे. सध्या जे काही घडतंय त्या पार्श्वभूमीवर तर हे आवश्यकच आहे. मराठीचे शेक्सपियर समजले जाणारे राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडला गेला, अशा प्रकारच्या घटना, समाजाची सेन्सॉरशिप या घटना निषेधार्हच आहेत.
पुरस्कारानंतर अजित भुरे यांनी लालन सारंग यांच्याशी संवाद साधत त्यांचा रंगमंचीय प्रवास उलगडला.