मायबापड्यांची कव्हा कीव येणार..?

By Admin | Updated: March 24, 2017 03:50 IST2017-03-24T03:50:00+5:302017-03-24T03:50:00+5:30

‘‘आखं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय. सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा कीव येणार

When will you come to Kiev? | मायबापड्यांची कव्हा कीव येणार..?

मायबापड्यांची कव्हा कीव येणार..?

तळेघर : ‘‘आखं आयुष्य सरलं पण आमच्या डोईवरचा हंडा काय खाली उतरला न्हाय. सरकारला आम्हा आदिवासी मायबापड्यांची कव्हा कीव येणार अन् आमच्या डोईवरचा हंडा कव्हा खाली येणार? मुलकातल्या पोरी आमच्या कोंढवळी देयाचं म्हणलं, तर पोरीचा बा म्हणतो, ‘नको गड्या पकी पाण्याची टिपवण (दुष्काळ) आहे. त्या गावाली माया पोरीचं आखं आयुष्य पाणी भरता-भरता जायाचं.’ आमच्या गावाली पोरी देयाला कोणी धजत नाही....’’ हे केविलवाणे शब्द आहेत आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील हजारो फूट डोंगरदऱ्यांमध्ये खोल असणाऱ्या कोंढवळ येथील आदिवासी महिला इंदूबाई लक्ष्मण कारोटे व रखमाबाई वाजे यांचे. मरणयातना सोसत घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात काढलेले हे शब्द...
आदिवासी भागात असलेले कोंढवळ हे गाव वन विभागाचा खोडा असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने व भौतिक सेवासुविधांच्या अभावाने आबाळलेलेच. कोंढवळ हे गाव शंभर घरांचा उंबरा असलेले. जवळपास चारशे ते पाचशेच्या आसपास लोकवस्ती असलेले हे आदिवासी गाव घनदाट अशा भीमाशंकर अभयारण्यात वसलेले असून एकदा का उन्हाळ्याची चाहूल लागली, की या गावातील आदिवासी बांधवांना दुष्काळाशी सामना करावा लागतो. दर वर्षीपेक्षा चालूवर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतल्याने या गावातील आदिवासी बांधव व महिलांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. या गावाला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने चरवीभर पाण्यासाठी तीन ते चार मैल जीव मुठीत घेऊन डोंगरदऱ्याखोऱ्यांमधून खडतर पायपीट महिलांना करावी लागत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यामध्ये हजार ते दीड हजार फूट दरीतमध्ये अत्यंत घनदाट जंगलामध्ये कोंढवळ हे गाव वसलेले असून, कोंढवळ गाव त्याचप्रमाणे शिंदेवाडी, गवांदेवाडी, उंबरवाडी, कृष्णावाडी केवाळवाडी या वाड्यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्रन् रात्र घालवावी लागत आहे. संपूर्ण गाव व वाड्यावस्त्यांसाठी एक कूपनलिका व त्यामध्येही सध्या पाण्याचा खडाखडाट झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किमी पायी जाऊन पुन्हा २५० ते ३०० फूट खाली खोल दरीत उतरून व पुन्हा तेवढेच वर चढून चोंढीच्या (झऱ्याच्या) धबधब्यावरून हंडा वर काढताना मरणयातना सहन कराव्या लागतात. या ठिकाणीही एका हंड्यासाठी अहोरात्र काढावे लागतात. आदल्या दिवशी नंबर लावल्यावर दुसऱ्या दिवशीच हंडाभर पाणी मिळते. डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा व २५० ते ३०० फूट वर चढत येताना या गावातील महिलांची दमछाक होते. हंडा वर चढून घेऊन येताना खाली पाहिले असता डोळे फिरतात. एकदा पाय घसरला, की २५० फूट खाली खोल असणाऱ्या दरीत कोसळण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. त्यामध्येही या चोंढीतील पाणी दूषित झाल्यामुळे या गावातील ग्रामस्थांना साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. वय वर्षे ६० असणाऱ्या कांताबाई गायकवाड लोकमतशी बोलताना म्हणाल्या, ‘‘एकीकडे घोटभर पाणी प्यायला नाही मिळाल्यावर मरण, तर दुसरीकडे पाणी आणताना दरीत पाय घसरून पडले तर मरण. आम्ही जीवन जगायचं तरी कसं? या वयात आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली, आम्ही पारतंत्र्यातच हाये.’’
आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हे पावसाचे माहेरघर समजले जाते. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडतो; परंतु दुर्भाग्य असे, की उन्हाळ्यात या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी सैरवैर भटकावे लागते. रणरणत्या उन्हामध्ये डोक्यावर हंडा व डोंगरदऱ्याकपाऱ्यांतून वणवण करावी लागते. चोंढीची दरी चढताना डोक्यावर हंडा असताना हातामध्ये काठी टेकवल्याशिवाय पुढील पाऊल टाकता येत नाही. कोंढवळ या गावाला वर्षानुवर्षे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे या गावामध्ये मुलींचे लग्न करण्यास मुलीचे वडील तयार होत नसल्याची खंत या गावातील महिलांनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: When will you come to Kiev?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.