MHADA Pune Lottery 2024 Result: म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ घरांची लॉटरी २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. ३,६६२ घरांसाठी अनामत रकमेसह ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
१० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ पासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात झाली. योजनेअंतर्गत ९३ घरे, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३५६९ घरांचा समावेश आहे. अर्जदारांना निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा आहे. अल्पावधीतच लॉटरीचा निकाल जाणून घेता येणार आहे.
विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती कळविली जाईल. विजेता ठरल्यानंतर अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे.
घर मिळवून देतो म्हणून लुटले...काही नागरिकांना अनधिकृत पद्धतीने घर मिळवून देतो, असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याची तक्रार भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांच्याकडे प्राप्त झाली आहे. नागरिकांना सुचित करण्यात आले आहे की, म्हाडाने कोणत्याही व्यक्तीला प्रतिनिधी अथवा मध्यस्थ म्हणून नेमलेले नाही. या कामासाठी कोणाशी संपर्क साधण्यात येऊ नये. अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यप्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिवे, सासवड, पिंपरी वाघेरे, महाळुंगे इंगळे व ताथवडे फक्त याच ठिकाणी सदनिकांचे वितरण करण्यासाठी विपणन संस्थांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्याद्वारे घरांचे वितरण करण्यात येत आहे.