महामार्गाचे रुंदीकरण होणार कधी?
By Admin | Updated: June 23, 2016 02:14 IST2016-06-23T02:14:48+5:302016-06-23T02:14:48+5:30
इंदापूर शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना बाह्यवळण रस्ता करण्यात आला.

महामार्गाचे रुंदीकरण होणार कधी?
महेंद्र कांबळे, इंदापूर
इंदापूर शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना बाह्यवळण रस्ता करण्यात आला. शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण कागदावरच ठेवले आहे. त्यामुळे अतिक्रमण वाढले. शहरातून गेलेल्या या जुन्या मार्गावरून जाणाऱ्या पादचारी, विद्यार्थी, नागरिकांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना जीव मुठीत धरून चालावे लागते.
पुणे-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण करताना अकलूज चौकापासून बाह्यवळण रस्ता करण्यात आला. शहराच्या बाहेरून रस्ता काढण्यात आला. त्याचवेळी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचेदेखील रुंदीकरण करण्याचे नियोजन होते; परंतु त्यामध्येदेखील राजकारण आले आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या काळात रस्त्याच्या लगत
असलेले व्यावसायिक बाधित
होतील. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. त्यामुळे रुंदीकरण थांबले आहे. परिणामी शहरातील या
मुख्य रस्त्यावरून जाताना
विद्यार्थी-नागरिकांना जीव मुठीत धरूनच जावे लागते.
अवजड वाहनांसह चारचाकी गाड्यांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. त्याचबरोबर शहरातील बाबा चौकातील मोकळ्या भूखंडालगत महामार्गाला लागूनच प्रवासी, तसेच मालवाहतूक गाड्यांचा ताफा लागलेला असतो. त्यामुळेदेखील वाहतुकीच्या कोंडीत भर पडते.
या जुन्या महामार्गाला मोकळा श्वास घेण्यासाठी रुंदीकरण
गरजेचे आहे.
‘हॉकर्स झोन’अंतर्गत जागा द्यावी
महामार्गाचे रुंदीकरण करताना पथारी व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात येऊ नये, यासाठी देखील नगरपालिकेने तरतूद करण्याची गरज आहे. राज्य शासनाने नगरपालिकांना ‘हॉकर्स झोन’ करण्याचे आदेश दिले आहेत. महामार्ग असल्यामुळे इंदापुरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. आंतरराज्य वाहतुकीमुळे वाहनांची गर्दी असते. तसेच, पथारी व्यावसायिकांनादेखील रस्त्यालगतच व्यवसाय सोयीस्कर ठरतो. त्यांना बाधित न करता महामार्गाच्या रुंदीकरणानंतर रस्त्यालगतच ‘हॉकर्स झोन’अंतर्गत जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे पथारी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अॅड. राहुल मखरे यांनी सांगितले.
मार्ग काढताना कसरत
जुना महामार्ग अकलूज चौक ते वाघ पेट्रोलपंपापर्यंत रुंद केला आहे. पुढे शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची गरज असताना वाघ पेट्रोलपंप टेंभुर्णी नाका ते सरडेवाडीपर्यंतच्या जुन्या महामार्गाचे रुंदीकरण थांबले आहे. त्याला निधी नसल्याचेदेखील सांगण्यात येते. मात्र, न्यायालय, एसटी बसस्थानक, काँग्रेस भवन, पंचायत समिती, इंदापूर महाविद्यालय, श्री नारायण रामदास हायस्कूल, इंदापूर नगरपालिका आदी महत्त्वाची कार्यालये जुन्या महामार्गालगतच आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अवजड गाड्यांसह चारचाकी गाड्यांची रेलचेल या मार्गावरच असते. त्यातून मार्ग काढताना सर्वांनाच कसरत करावी लागते.