चाकणच्या चौकांनी घेतला अखेर मोकळा श्वास
By Admin | Updated: June 18, 2015 23:25 IST2015-06-18T23:25:50+5:302015-06-18T23:25:50+5:30
तब्बल चार वर्षांनंतर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आल्याने चाकणच्या नागरिकांसह

चाकणच्या चौकांनी घेतला अखेर मोकळा श्वास
चाकण : तब्बल चार वर्षांनंतर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तात वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आल्याने चाकणच्या नागरिकांसह येथील चौकांनीही मोकळा श्वास घेतला़
राष्ट्रीय महामार्ग, महसुल, चाकण नगरपरिषद, आय आर बी रस्ते कंपनी यांच्या पुढाकाराने मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली़
गेल्या अनेक दिवसांपासून चाकण शहरात अतिक्रमणांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे चाकण मधील नागरिक अगदी रडकुंडी ला आले होते. ‘लोकमत’ ने त्याविरोधात अनेकदा आवाज उठविला होता़ त्या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई करून पुणे नाशिक महा मार्गावरील अतिक्रमणावर हातोडा मारला. पुढील पाच दिवस हि कारवाई चालू राहणार आहे . आज (१८) सकाळी साडे सात वाजल्यापासून रात्री साडे सात वाजेपर्यंत तळेगाव चौकापासून नाणेकर वाडी उड्डाणपूल व आंबेठाण चौकापर्यंत कच्ची पक्की अतिक्रमणे जेसीबी च्या सहाय्याने उकरून टाकण्यात आली. त्यामध्ये महामार्गावरील मोठ्या व्यावसायिकाची दुकाने ही जमीनदोस्त केली गेली. प्रांत अधिकारी हिम्मतराव खराडे, तहसीलदार प्रशांत आवटे, पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कानडे , चाकण नगर परिषदचे प्रशासक कैलास गावडे, आय आर बी कंपनीचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे पदाधिकारी, पोलिस निरीक्षक दगडू पाटील यांच्या सह चाकण, राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव, नारायणगाव आदी पोलिस ठाण्यामधून पोलिसांची मोठी कुमक आणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .(वार्ताहर)
पूर्वसूचना न देता प्रशासनाने अचानक कारवाई केल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यात मोठी नाराजी होती.
दोन जण जखमी
रमेश हॉटेल शेजारील एका मोबाईल शॉपीमधील काचेचे सामान हलविताना दोन जणांना काच फुटून कापले. त्यापैकी एक जण गंभीर जखमी आहे. दिनेश नारायण चौधरी ( वय २५ , रा. चाकण) हा कारवाई करण्यापूर्वी काचेचे सामान हलविताना गंभीर जखमी झाला आहे.