आता ओरडून काय फायदा?
By Admin | Updated: October 3, 2015 01:50 IST2015-10-03T01:50:26+5:302015-10-03T01:50:26+5:30
हिराबाग, श्रावणधारा हे भूखंड बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय चुकीचाच आहे. यासंदर्भात धोरण ठरवायला सांगितले होते

आता ओरडून काय फायदा?
पुणे : हिराबाग, श्रावणधारा हे भूखंड बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय चुकीचाच आहे. यासंदर्भात धोरण ठरवायला सांगितले होते, ते न ठरवताच निर्णय घेतला गेल्यामुळे पक्षाची विनाकारण बदनामी झाली. असे होता कामा नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज महापालिकेतील पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांना बजावले. विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार होता, त्या वेळी काही केले नाही मग आता उगाचच ओरडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
पक्षाच्या महापालिकेतील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी बारामती होस्टेल येथे आज दुपारी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत सध्या सुरू असलेल्या कार्यप्रणालीविषयी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. हिराबाग व श्रावणधारा हे दोन मोठे भूखंड या योजनेतंर्गत बांधकाम व्यावसायिकांना देण्याचा ठराव नुकताच सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. असे निर्णय घेण्याआधी या विषयाचे धोरण ठरवण्याची सूचना मागील बैठकीत दिली होती.
तसे न करताच हे दोन्ही निर्णय घेण्यात आले. यात पक्षाची विनाकारण बदनामी झाली. अशा १५२ जागा पुण्यात आहेत. त्या सगळ्या याच पद्धतीने देणार का, असा सवालही पवार यांनी विचारला. यापुढे असे चालणार नाही, जागा कशा द्यायच्या, त्यात महापालिकेचा फायदा काय होईल या सगळ्याचा विचार करून धोरण ठरवा, असे त्यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या सरकार नियुक्त समितीने तयार केलेल्या पुणे शहर, जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावर बोलतानाही पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांना बरेच सुनावले. तुमच्या हातात अधिकार होते, त्या वेळी भांडत बसलात, त्यामुळे सरकारने हा आराखडा ताब्यात घेऊन स्वत: तयार केला. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे आता यात काही होणार नाही. आयुक्त पुढच्या आठवड्यात खासदार, आमदार, नगसेवक यांच्यासाठी या आराखड्याचे सादरीकरण करणार आहे. त्या वेळी ज्या काही सूचना, हरकती असतील त्या नोंदवा, बाकी आता यात दुसरे काहीही होणार नाही, त्यामुळे उगीच आरडाओरडा करू नका, असेही त्यांनी बजावले.
पक्षाच्या काही नगरसेवकांनी बैठकीतच आमच्या प्रभागांमधील कामांसाठी निधी उपलब्ध होत नाही, अशी तक्रार केली. त्याची दखल घेत पवार यांनी सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांनी यात लक्ष घालावे, अशी सुचना केली. पक्षाची टीम चांगली आहे, मात्र सगळ्यांचे आपापसात मतभेद आहेत. ते त्वरित मिटवा, त्याशिवाय चांगले काम होणार नाही. संधी मिळाली आहे, त्याचे सोने करा, पक्षाला बदनाम करू नका, असे त्यांनी सांगितले. बैठकीला पक्षाच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते बंडू केमसे, तसेच सर्व नगरसेवक, माजी महापौर अंकुश काकडे व
अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांच्या या बैठकीकडे मोठी राजकीय घडामोड म्हणून पाहिले जात
आहे. (प्रतिनिधी)