त्यांचा साहित्याशी काय संबंध?
By Admin | Updated: October 30, 2015 00:24 IST2015-10-30T00:24:15+5:302015-10-30T00:24:15+5:30
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय

त्यांचा साहित्याशी काय संबंध?
पुणे : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय, असा थेट सवाल ज्येष्ठ साहित्यिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी उपस्थित केला. कलबुर्गी यांची झालेली हत्या दुर्दैवी आहे. माझ्यावरही शाब्दीक हल्ले झाले, सनातनी ठरविले गेले. कर्नाटकात कॉँग्रेसेचे राज्य आहे, दादरीत डाव्या विचारसरणीचे राज्य आहे. असे असताना या घटनांना मोदी जबाबदार कसे, असेही ते म्हणाले.
अक्षरधाराने आयोजित केलेल्या ५५०व्या दीपावली शब्दोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी भैरप्पा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात कन्नड अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्घाटन समारंभास प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. नरसिंह मांकडे उपस्थित होते.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाली. त्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले. सध्याचे वातारवण बघता साहित्यिकांनी काय करावे, या प्रश्नाला उत्तर देताना भैरप्पा म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाव्या विचारसरणीचे राज्य आले. पंडित नेहरू डाव्या विचारसरणीचे होते. डाव्या विचारसरणीची कार्यपद्धती अवलंबली गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून नेहरूंची नातलग नयनतारा सेहगल यांनी पुरस्कार परत केला. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अर्जुनसिंह यांचे जवळचे असलेले अशोक वाजपेयी बोलत आहे. त्यांचे साहित्यात काय योगदान आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या-त्या राज्यांची आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनांना मोदी जबाबदार कसे?
डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पारखा’ या कादंबरीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी या कादंबरीविषयी विवेचन केले. डॉ. मांडके, डॉ. बोरसे, प्रा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)