कृषी कायदा विरोधातील जनजागरण यात्रेचे शिरूर शहरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:13+5:302021-01-13T04:26:13+5:30
केंद्र शासनाच्या कृषी कायदा विरोधातील जनजागरण करणाऱ्या पोलखोल यात्रेचे शिरूर शहरात स्वागत करण्यात आले. शिरूर कृषी उत्पन्न ...

कृषी कायदा विरोधातील जनजागरण यात्रेचे शिरूर शहरात स्वागत
केंद्र शासनाच्या कृषी कायदा विरोधातील
जनजागरण करणाऱ्या पोलखोल यात्रेचे शिरूर शहरात स्वागत करण्यात आले.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुणतांबा येथून आलेल्या या यात्रेचे स्वागत बाजार समितीचा आवारात लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रवींद्र धनक यानी केले. या वेळी लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड ओमप्रकाश सतीजा, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मोहम्मद हुसेन पटेल, शिवाजीराव खेडकर, ॲड. विक्रम पाचंगे, खुशाल गाडे, वसंत बेंद्रे, डॉ. सुभाष गवारी, दीपक गायकवाड, अझिम सय्यद या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृतीसाठी निघालेली पोलखोल यात्रा आज शिरूर शहरात आली. या यात्रेत संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी संदीप गिड्डे, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मण वंगे, प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर,अरुण कान्होरे, नितीन थोरात सहभागी झाले होते.
या पोलखोल यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाचे नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी कसे आहेत, याबाबत जनजागरण करण्यात येणार आहे. ही यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार असून या यात्रेचा समारोप २० जानेवारीला नांदेड येथे होणार आहे.
या वेळी बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी सांगितले की,
केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. असे सरकारला वाटत आहे. सरकार या गोष्टीवर ठाम आहे. तसेच
शेतीमालाच्या
निर्धारित किमतींची शेतक-यांची आग्रही मागणी असताना
सरकार सकारात्मक नसल्याने शेतकरी आंदोलनाची कोंडी अद्याप कायम आहे.
मात्र, वास्तविक पाहता हे कायदे ना शेतकऱ्यांच्या ना ग्राहकांच्या हिताचे आहेत. या कृषी कायद्याचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फटका बसणार असून दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन देशातील आहे असा दावा त्यांनी केला. हे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलखोल यात्रा काढण्यात आल्याचे गिड्डे यांनी स्पष्ट केले.
दिल्ली येथील शेतक-यांचे आंदोलन संपूर्ण देशभरातील शेतक-यांचे आहे. जास्तीजास्त शेतक-यांनी या पोलखोल यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन थोरात यानी केले.
शिरूर येथे पोलखोल यात्रा शहरात आली असता तिचे स्वागत करण्यात आले.