फुलबाजारातील कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटीची मागणी
By Admin | Updated: March 4, 2015 00:36 IST2015-03-04T00:36:47+5:302015-03-04T00:36:47+5:30
मार्केट यार्डातील फुलबाजार कर्मचाऱ्यांना शनिवारी साप्ताहिक सुटी मिळावी, अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनने केली आहे.

फुलबाजारातील कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुटीची मागणी
पुणे : मार्केट यार्डातील फुलबाजार कर्मचाऱ्यांना शनिवारी साप्ताहिक सुटी मिळावी, अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनने केली आहे.
या मागणीबाबत पणन संचालक दिनेश ओऊळकर आणि पुणे ग्रामीण विभागाच्या सहकारी संस्थांचे उपनिबंधक अरुण काकडे यांना पत्र दिले आहे, अशी माहिती कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली. ‘‘मार्केट यार्डातील फळ बाजार, भाजीपाला बाजार आणि भुसार बाजारातील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी देण्यात आली आहे. मात्र, फुलबाजारातील कर्मचाऱ्यांना या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबत बाजार समिती, तसेच संबंधित घटकांशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही अद्याप आमची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. सलग काम करावे लागत असल्याने फुलबाजारातील कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होत आहे. ठराविक लोकांच्या आठमुठेपणामुळे हे घडत आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास येत्या मंगळवारी (दि. १०) कामबंद आंदोलन करू ,’’ असा इशारा त्यांनी दिला.
फुलबाजारात शनिवारी फार तर २० टक्के आवक होते. त्या दिवशी कामगारांना सुटी दिल्यास नुकसान होईल, हे आम्ही समजू शकतो. मात्र, यासाठी कामगारांना वेठीस धरणे पूर्णत: चुकीचे आहे. इतर बाजाराच्या कामगारांना मिळणारी साप्ताहिक सुटी बघता फुलबाजारातील कामगारांवर हा अन्यायच आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या मालाची विक्री आणि इतर कामे केल्यास आमची त्याला हरकत नाही.
- संतोष नांगरे,
सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन
लवकरच तोडगा काढू
फुलबाजारातील कामगारांना साप्ताहिक सुटी मिळत नाही, हे खरे आहे. ती मिळावी, याबाबतची मागणी करणारे पत्र कार्यालयाला मिळाले आहे. याबाबत संबंधित घटकांसोबत चर्चा करून लवकरच तोडगा काढण्यात येईल.
- दिनेश ओऊळकर,
पणन संचालक