श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरींचा विवाहसोहळा

By Admin | Updated: February 11, 2017 19:22 IST2017-02-11T19:22:04+5:302017-02-11T19:22:04+5:30

पुरंदर येथे पौर्णिमेच्या रात्री लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा पार पडलेला लग्न सोहळा.

Weddings of Shrinath Mhaskoba and Mother Jogeshwari | श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरींचा विवाहसोहळा

श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरींचा विवाहसोहळा

ऑनलाइन लोकमत

पुरंदर दि. 11- श्रीक्षेत्र वीर येथे शुक्रवार माघ शु.पौर्णिमेच्या रात्री टिपूर चांदण्यात चंद्राच्या साक्षीने, लाखो भाविकांच्या उपस्थितीत रात्री 2 वाजता पारंपरिक पद्धतीने मंत्रोपचार, भैरव अष्ठकमचे पठण होऊन २.१५ वाजता मंगलाष्टका होऊन श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा नेत्रदीपक लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला. 
 
यावेळी सर्वदूर फटाक्यांची जोरदर आतषबाजी, इलेक्ट्रिक फायर शोच्या जोरदार सलामीने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, तर देऊळवाडा व परिसर सवाई सर्जाचं चांगभलं व माता जोगेश्वरीच्या भव्य गजराने दुमदुमुन गेला होता. हा नेत्रदीपक लग्नसोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच भाविक मंदिरात मिळेल त्या ठिकाणी जागा धरून बसले होते. या वेळी  राज्यभरातून तसेच कर्नाटक राज्यातून सुमारे तीन लाखांपर्यंत  भाविक उपस्थित होते. 
 
सकाळी देवांना अभिषेक, ११ वाजता दहीभात पूजा झाली व दुपारी  १२ वाजता धुपारती होऊन मुख्य  गाभारा बंद करण्यात आला.  एक वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. सायंकाळी सहानंतर विविध मार्गांवरून मानाच्या काठ्या व पालख्या वीरनगरीत प्रवेश करू लागल्या. सायंकाळी ८ वाजता मानाची कोडीतची पालखी मोठ्या लवाजम्यासह दाखल झाली. पालखीचा व वºहाडी मंडळींचा भेटाभेटीचा कार्यक्रम झाला. या वेळी पाटील, देवस्थानचे पंच, मानकरी, गुरव, ब्राह्मण उपस्थित होते.
 
यानंतर पालखी पालखीतळावर स्थानापन्न झाली. महाप्रसाद वाटण्यात आला. रात्री ११.३५ वाजता मानकरी समस्त राऊत
मंडळीचा देवांना पोशाख होऊन देवदेवतांना लग्नासाठी आवाहन करण्यात आले. रात्री बारा वाजता एक मंदिर प्रदक्षिणा होऊन देवाची पालखी सोबत बाहेरून कोडीतची पालखी घेऊन अंधारचिंच येथे गेल्या, त्या ठिकाणी वाईची पालखी (सूर्यवंशी) व कन्हेरीची (पाटणे) काठी यांची भेटाभेट झाली. पाच मानकरी, शिंगाडे, तरडे, बुरूंगले, व्हटकर, ढवाण  यांना फुलांच्या  माळा घालण्यात आल्या.
 
नंतर  सर्वकोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे (कसबापेठ),वाई, सोनवडी या सात  पालख्या, काठ्या ढोल-ताशांच्या गजरात रात्री २ वाजता देऊळवाड्यात आल्या. या वेळी सर्व मानकरी, दागिनदार, सालकरी, पाटील, देवस्थानचे पंच, पुरोहित गुरव, ग्रामस्थ, भाविक पालख्या काठ्यांबरोबर दाखल झाले. मुकदम पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली व मंत्रोपचार  होऊन २.१५ वाजता  श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा मोठया थाटात पार पडला. 
 
लग्न सोहळ्यानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई, फुलांची सजावट विश्वस्त दिलीप धुमाळ व नामदेव येनबर यांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच यावेळी  प्रथमच वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रिक फायर शो चे सौजन्य शिरीष गवते यांनी केले. तर, देवस्थान ट्रस्टच्या वतीने जागोजागी मोठ्या पडद्यावर या सोहळयाचे चित्रण दाखण्यिात आल्यामुळे सर्वांना हा सोहळा पाहता आला.
 
लग्न सोहळ्यानंतर मंदिर  प्रदक्षिणा होऊन सर्व काठ्या ,पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी  देऊळवाड्यातून  बाहेर  पडल्या व  पहाटे पुन्हा मंदिर प्रदक्षिणा करून आपापल्या जागेवर स्थानापन्न झाल्या.मंदिरापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही, एस.टी. महामंडळाने भाविकांसाठी जादा बसेसची सोय ,पुणे महानगर पालिकेने पिण्याच्या पाण्याचा ट्रँकर,रुग्णवाहिका, फिरते शौचालय यांची सोय केली होती.  तर हा लग्न सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी  देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक व सासवड पोलिस स्टेशन यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
 दहा दिवस येथे मोठी यात्रा भरते. या काळात येथे कोडीत, कन्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे (कसबापेठ),वाई,सोनवडी प्रमुख  पालख्यांसह ) राज्याच्या कानाकोपºयांतून  लाखो भाविक मुक्कामी राहणार आहे. पंचमीपासून येथे गर्दीत आणखी वाढ होऊन मानकºयांच्या अंगात संचार येऊन भाकणूक  (वार्षिक पीक, पाणी)सांगण्यास, गज-गोपाळ (जेवन) घालण्यास सुरूवात होईल, असे देवस्थान ट्रस्टच्या  वतीने सांगण्यात आले.
 

Web Title: Weddings of Shrinath Mhaskoba and Mother Jogeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.