पिंपरी-चिंचवड पोलिसांची ' वेबसाईट लाँच ' : मोबाइल, टॅब, आयपॅडवरूनही करता येणार व्हिजीट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 07:08 PM2019-12-18T19:08:59+5:302019-12-18T19:13:29+5:30

सिटीझन अलर्ट वॉलवर पोलिसांनी दिलेली माहिती नागरिक देखील पाहू शकणार

Website launch Pimpri-Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड पोलिसांची ' वेबसाईट लाँच ' : मोबाइल, टॅब, आयपॅडवरूनही करता येणार व्हिजीट

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ' वेबसाईट लाँच ' : मोबाइल, टॅब, आयपॅडवरूनही करता येणार व्हिजीट

Next
ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार संकेतस्थळ इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये तयार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) बुधवारी (दि. १८) लोकार्पण करण्यात आले. पोलीस आयुक्त  संदीप बिष्णोई यांच्या हस्ते वेबसाईटचे लॉंचिंग झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या वेबसाईटला मोबाइल, टॅब, आयपॅडवरूनही '' व्हिजीट'' करता येणार आहे. त्यामुळे या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत.
संकेतस्थळ इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना ई-तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सिटीझन अलर्ट वॉलवर पोलिसांनी दिलेली माहिती नागरिक देखील पाहू शकणार आहेत. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार, पोलीस भरती विषयक माहिती, पोलीस विभागाचे विविध उपक्रम, सुरक्षेबाबत दक्षता, शहरातील वाहतूक विषयक माहिती नागरिकांसाठी उपलब्ध आहे. नव्या संकेतस्थळावर पिंपरी- चिंचवड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध पोलीस शाखा व पोलीस ठाण्यांचे अधिकारी यांचे संपर्क क्रमांक तसेच नागरिकांना नजिकच्या पोलीस ठाण्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडील मदतीकरिता विविध हेल्प लाइनची माहिती देण्यात आली आहे.
अंध व्यक्तींना देखील स्क्रीन रिडर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने हे संकेतस्थळ वापरणे सुलभ आहे. लॉस्ट अँड फाउंड (हरविले - सापडले) या टॅबवरून नागरिकांना अति महत्त्वाची वस्तू हरवल्याची व सापडल्याची माहिती पोलिसांना तात्काळ घरबसल्या देता येणार आहे. या संकेतस्थळावर नागरिकांना भाडेकरूंची माहिती, हरविलेल्या व्यक्तींबाबत माहिती, चोरीस गेलेली व बेवारस वाहने, अनोळखी मृतदेह, पोलीस पडताळणी सेवा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध प्रकारचे परवान्यांसाठीचे विहित नमुन्यातील अर्जदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग असल्याने, तसेच सर्व नागरिक मोबाईल व इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने, त्यांना त्याव्दारे पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या संकेतस्थळावर आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विकसित केलेले संकेतस्थळ निश्चितच उपयोगी ठरणार असल्याने, नागरिकांनी पोलीस कामकाजासाठी सदर संकेतस्थळाचा वापर करावा.
- संदीप बिष्णोई, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: Website launch Pimpri-Chinchwad Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.