आम्ही इथेच राहून शेती करू
By Admin | Updated: August 30, 2014 00:12 IST2014-08-30T00:12:22+5:302014-08-30T00:12:22+5:30
आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे

आम्ही इथेच राहून शेती करू
घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर डोंगराचा काही भाग कोसळून १५१ जण गाडले गेलेल्या घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. एक महिना होऊनही माळीण गावातील सुदैवाने बचावलेले लोक व त्यांचे नातेवाईक दु:खातून सावरलेले नाहीत. तात्पुरती घरे बांधण्याचे काम सुरू असून, सध्या हे लोक आसाणे आश्रमशाळेत आश्रयाला आहेत.
माळीण ग्रामस्थांचे अडिवरे गावाजवळ कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत झाला आहे. मात्र, पुनर्वसनाबाबत त्यांच्यात एकमत नाही. बाहेरगावी राहणारे माळीणचे लोक डिंभे, घोडेगाव अशा सधन भागात पुनर्वसन करून मागत आहेत, तर माळीणमध्ये राहणारे लोक येथेच जवळपास पुनर्वसन व्हावे, अशी मागणी करत आहेत. शासनाने अडिवरे गावाजवळ जागा निश्चित केली असली तरी या जागेलाही सगळ्यांची पसंती नाही. तसेच गावातील १५ तरुणांना नोकरीची गरज आहे. त्यांना शासनाने नोकरीत घ्यावे, अशी मागणीदेखील माळीण ग्रामस्थ करत आहेत.
माळीण फाट्यावर असलेल्या शाळेच्या पटांगणात तात्पुरती पत्र्यांची ३० घरे बांधण्याचे काम सुरू असून, दि. १० सप्टेंबरपर्यंत ही घरे ताब्यात दिली जाणार आहेत. या घरांचे काम सध्या युद्धपातळीवर येथे सुरू आहे, तर अडिवरे गावाजवळ भैरवनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत घोडेगाव येथील बैठकीत निर्णय झाला आहे. या निर्णयाला बैठकीत सर्वांनी मान्यता दिली. मात्र, सध्या या जागेला देखील विरोध होऊ लागला आहे.
माळीण लोकांचे ईथंच जवळपास पुनर्वसन झाले तर या लोकांना शेती करता येईल. शहरातील लोक खाली पुनर्वसन मागत आहेत. त्यामुळे त्यांच्यात द्विधा मनस्थिती आहे. या लोकांमध्ये एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे शाश्वत संस्थेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.
प्रत्येक मृत व्यक्तीमागे दहा ते अकरा लाख रुपये मिळणार आहेत. आर्थिक मदतीबरोबरच सर्व योजनांचा फायदाही माळीण ग्रामस्थांना देण्यात आला आहे. अनेक मृतांच्या वारसांची नोंद झाली असून, हे मदतकार्य वाटप करण्यासही सुरुवात झाली आहे. घटनास्थळी माळीण गावात कोणीही राहत नाही; मात्र माळीण पाहायला येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. (वार्ताहर)