पोरगं नशीबवान होतं म्हणून आम्ही वाचलो!
By Admin | Updated: July 28, 2015 00:32 IST2015-07-28T00:32:35+5:302015-07-28T00:32:35+5:30
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत काही घरांमधील संपूर्ण कुटुंब गेले; पण रुद्र या चिमुकल्या तीन महिन्यांच्या बालकाने रडून मदतकार्यासाठी

पोरगं नशीबवान होतं म्हणून आम्ही वाचलो!
घोडेगाव : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत काही घरांमधील संपूर्ण कुटुंब गेले; पण रुद्र या चिमुकल्या तीन महिन्यांच्या बालकाने रडून मदतकार्यासाठी आलेल्या गावकऱ्यांना जागे केले. यामुळे त्याची आई, आजी, आजोबा वाचले. हा रुद्र आता एक वर्ष व तीन महिन्यांचा झाला आहे. मुलगा नशीबवान असल्यामुळे एवढ्या भयंकर दुर्घटनेतून वाचलो असल्याचा आनंद व नातेवाईक दुर्घटनेत मरण पावल्याचे दु:ख त्याच्या आईला आजही आहे.
दि. ३० जुलै रोजी माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. सकाळी आठच्या सुमारास पाणी, माती व दगड धोंड्यांचा ढिगारा घरावर आला. हे घर एका बाजूला असल्यामुळे मोठा ढिगारा या घरावर पडला नाही. काही कळायचा आत घराचे छप्पर रुद्र व त्याची आई प्रमिला हिच्या अंगावर पडले. मातीच्या ढिगाऱ्यात घर गाडले गेल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते.
डोंगरावर राहणाऱ्या पसारवाडी, लेंभेवाडी, पोटेवाडी या माळीणच्या वाड्यावस्त्यांमध्ये बातमी पोहोचली. यातील काही ग्रामस्थ माळीणकडे आले. येथे पोहोचल्यानंतर माळीणवर पडलेला ढिगारा पाहत असतानाच अपुऱ्या पडक्या घरातून रडण्याचा त्यांना आवाज आला. लगेच ग्रामस्थांनी व मदत कार्यासाठी आलेल्या मुलांनी घराकडे धाव घेतली व यातून रुद्र, त्याची आई प्रमिला व आजी-आजोबांना सुखरूप बाहेर काढले. ताबडतोब त्यांना मंचर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या दुर्घटनेच्या आठवणींबाबत प्रमिला मच्छिंद्र लेंभे यांच्याशी चर्चा केली असता, रुद्र आता एक वर्ष तीन महिन्यांचा झाला आहे. पोरगं नशिबवान होतं म्हणून आम्ही वाचलो. आमच्या अंगावर छत नसते पडले, तर आम्हीही गेलो असतो. पोरगं रडलं म्हणून ढिगाऱ्याजवळ आलेल्या वाडीच्या लोकांनी आम्हाला काढलं. रुद्रचे वडील पुण्याला होते व आम्ही सगळे घरी.
या दुर्घटनेत आमच्या घरातील सगळे थोडक्यात वाचले, पण नातेवाई व गावकरी गेल्याचे अजूनही दु:ख होते. रुद्रला कल्याण येथील दहीहंडी मंडळाने एक लाख व शासनाने ९ हजार रुपये दिले. (वार्ताहर)