पर्यावरणपूरकतेचा ध्यास घ्यावा, हौदामध्येच बाप्पाला निरोप द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:44+5:302021-09-19T04:10:44+5:30
-लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज! लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी मंगलमयी सांगता होत ...

पर्यावरणपूरकतेचा ध्यास घ्यावा, हौदामध्येच बाप्पाला निरोप द्यावा
-लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी मंगलमयी सांगता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेनेही जय्यत तयारी केली आहे़ पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालय / प्रभागनिहाय २८३ गणेश मूर्ती संकलन केंद्र व १९० फिरते विसर्जन हौद सध्या सज्ज आहेत.
घरच्या गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करावे, या आवाहनास नागरिकांनीही आठ दिवसांत मोठा प्रतिसाद दिला आहे़ तब्बल ५५ हजार ३६४ किलो अमोनियम कार्बोनेट नागरिकांनी नेले आहे, तर अनेकांनी महापालिकेच्या फिरत्या विसर्जन हौदात गणेश विसर्जन करण्याबरोबरच, महापालिकेच्या गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर गणेश मूर्ती दिल्या आहेत.
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नागरिकांना घरबसल्या, आपल्या घराजवळील गणेश मूर्ती संकलन केंद्र तथा फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था वेळेसह प्राप्त व्हावी, याकरिता संबंधितांचे मोबाईल क्रमांकांसह सविस्तर माहिती असलेली लिंक महापालिकेने प्रसिद्ध केली आहे़ महापालिकेच्या http://bit.ly/3hvmdof या लिंकवर क्लिक केल्यावर नागरिकांना, घराजवळील गणेश विसर्जन व्यवस्थेची माहिती मिळणार आहे.
--------------------
शहरात २८३ गणेश मूर्ती संकलन केंद्र
महापालिकेच्या वतीने शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये, समाज मंदिर, आरोग्य कोठी आदींसह उपनगरांमधील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्य अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणेश मूर्ती संकलन केंद्र कार्यरत केली असून, ही एकूण संख्या २८३ इतकी आहे़ यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात संकलन केंद्र ही महापालिकेच्या शाळांमध्ये उभारली आहेत़ आठव्या दिवशीपर्यंत शहरातील या केंद्रांवर ३० हजार ३५९ मूर्ती संकलन झाले आहे, तर ८६ हजार ७२३ किलो निर्माल्य जमा झाले आहे़
-------------------
१९० फिरते विसर्जन हौद : ७७ हजार मूर्तींचे विसर्जन
शहरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ६०, पंधरा क्षेत्रीय कार्यालयांचे ५८, तर शुक्रवारपर्यंत लोकप्रतिनिधींचे ७२ फिरते विसर्जन हौद नागरिकांच्या सेवेत आहेत़ यामध्ये लोकप्रतिनिधींच्या फिरत्या हौदांची संख्या वाढत आहे़ आठव्या दिवसापर्यंत गणेश विसर्जनासाठी १९० फिरते हौद कार्यरत होते़ यामध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत ७७ हजार ४२६ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे़
---------------------------
नदी घाटावर गणेश विसर्जनासाठी येऊ नये
महापालिकेने शहरातील सर्व नदी घाटांवर गर्दी होऊ नये, याकरिता गणेश विसर्जनास बंदी घातली आहे़ त्यामुळे नदी घाटावर गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन महापालिकेचे घनकचरा विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी केले आहे़ कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता कोणीही गर्दी न करता, फिरत्या विसर्जन हौदांमध्ये श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे तसेच मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती द्याव्यात़ या सर्व मूर्ती एकत्रित करून महापालिकेच्या वतीने वाघोली येथील खाणीमध्ये विसर्जित केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़
-------------------------------